उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
marathinews24.com
मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या यशानं महाराष्ट्राला आनंद झाला आहे, अशा शब्दात त्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
वैभवी देशमुख हिला पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, “इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत 85.33 टक्के गूण मिळवून तू उत्तीर्ण झाल्याचे समजून माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर अत्यंत दु:खद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात मिळवलेलं यश तूझ्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडवणारं आहे. तूझ्या यशातून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना लढण्याची, यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे.
तूझ्या यशानं वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खुप आनंद झाला असता, ते आज आपल्यासोबत नसले तरी तितकाच आनंद महाराष्ट्र आज अनुभवत आहे. तुझ्या कष्टांना, जिद्दीला सलाम. यापुढेही शैक्षणिक कारकिर्दीत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तूला असंच यश मिळत राहो, आम्ही सर्व कायमच तूझ्यासोबत आहोत,” असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.