खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील ६ जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. घरावर दगडफेक, तसेच दुचाकीची तोडफोड करण्यात आली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत प्रिया सुमीत चव्हाण (वय २९, रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजू हरिश्चंद्र चव्हाण (वय ५२), प्रवीण राजू चव्हाण (वय २६), शुभम संजय चव्हाण (वय २७), सुयश संजय चव्हाण (वय २४), जयश्री राजू चव्हाण (वय ५०), रेश्मा राजू चव्हाण (वय ३०), प्रियांका प्रवीण चव्हाण (वय २४), काजल सुयश चव्हाण (वय २१), बेबी अशोक मुळेकर (वय ५१, सर्व रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात शिरणाऱ्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
आरोपींनी केेलेल्या मारहाणीत प्रिया चव्हाण, त्यांचे पती सुमीत, सासरे बापू, आजी आशा सावंत, सासू उषा, नणंद उर्मिला, जाऊ सीमा हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रिया चव्हाण आणि आरोपी हे शेजारी राहायला आहेत. जागेच्या वादातून त्यांच्या न्यायालयीन वाद सुरू आहेत. घरासमोर पाण्याचा ड्रम ठेवल्याने आरोपी आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये सोमवारी (१२ ऑक्टोबर) दुपारी सव्वातीनच्या सुमारास वाद झाला. वादातून आरोपींनी चव्हाण कुटुंबीयांना मारहाण केली. त्यांना दगड फेकून मारला, तसेच घराच्या दरवाज्यावर दगडफेक केली. दुचाकीची तोडफोड केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.
सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची ६८ लाखांची फसवणूक
अटकेची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला कोथरूड भागातील डहाणूकर काॅलनी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. हे पैसे दहशतवादी संघटनांना पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून अटक करण्यात येणार आहे. अटकेची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी धमकी सायबर चोरट्यांनी त्यांना दिली. गेल्या आठ महिन्यात सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला वेळोेवेळी धमकावून त्यांच्याकडून ६८ लाख रुपये घेतले. सायबर चोरट्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर चोरट्यांकडून पैशांची मागणी सुरू होती. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.























