चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Crime News : शहरातील मध्यवर्ती तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुद्ध सोन्याच्या नावाखाली पुणे, पिंपरीतील सराफांची फसवणूक – सविस्तर बातमी
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसरमधील मांजरी भागात राहायला आहे. रविवारी (१३ जुलै) महिला कुटुंबीयांसह तुळशीबागेत सायंकाळी खरेदीसाठी आली होती. रविवार असल्याने तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी होती. सायंकाळी पाचच्या सुमारास तुळशीबाग गणपती मंदिरासमोर चोरट्याने महिलेची छोटी पर्स लांबविली. पर्समध्ये दागिने आणि रोकड असा ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तुळशीबागेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार गोरे तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात तुळशीबागेत एका महिलेची दागिने आणि रोकड असलेली पर्स चोरून नेली होती. तुळशीबागेत होणाऱ्या चोरीच्या घटनाच्या पार्श्वभूमवर दोन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होेते.
पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरी
Crime News : पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ४० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७४ वर्षीय महिला नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्या १२ जुलै रोजी सायंकाळी स्वारगेट पीएमपी स्थानकातून वाकडेवाडीकडे निघाल्या होत्या. पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक आलाटे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वानवडी पोलिसांनी एका चोरट्याला नुकतीच अटक केली. त्याच्याकडून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याचे २० गुन्हे उघड आले होते. गर्दीच्या मार्गावरील पीएमपी बसमध्ये शिरुन चोरटे महिलांकडील दागिने, रोकड लांबवितात.
दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Accident – भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. शाहूराज लक्ष्मण बाराते (वय ४२, रा. रवी दर्शन, बनकर काॅलनी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत बाराते यांचा मुलगा पुरुषोत्तम (वय २०) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूराज बाराते हे १२ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी शेवाळवाडी पीएमपी स्थानक परिसरात भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात बाराते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालायात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेणात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे तपास करत आहेत.