गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाला लगाम; प्रेशरमेड, प्लाझ्मावरही बंदी
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी यंदा चार बेस आणि चार टॉपची मर्यादा जवळपास निश्चित करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत पोलिस प्रशासन आणि मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत एकमत झाले असून, या मर्यादेपेक्षा एकही बेस किंवा टॉप वाढविल्यास संबंधित मंडळावर थेट गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा कठोर इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्याचबरोबर प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरालाही पूर्णपणे मनाई केली असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास गुन्हा आणि जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी – सविस्तर बातमी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा यंदा पुण्यात चांगलाच तापला आहे. कर्णकर्कश डीजेमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात विविध भागांतील नागरिकांनी आवाज उठविला असून, ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ करण्याची मागणी पुढे आली आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती तसेच निवासी भागातील नागरिकांना मोठ्या आवाजाचा होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनीही ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे.
गणेश मंडळांच्या बैठकीत साऊंड सिस्टिमच्या मर्यादेबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार विसर्जन मिरवणुकीत चार बेस आणि चार टॉप ठेवण्याबाबत जवळपास एकमत झाले आहे. या संख्येपेक्षा अधिक साऊंड उपकरणे लावून आवाजाची तीव्रता वाढविण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. एखाद्या मंडळाने चार बेस-चार टॉपच्या मर्यादेपेक्षा अधिक उपकरणे लावली किंवा मिरवणुकीदरम्यान अतिरिक्त बेस अथवा टॉप जोडला, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. नियमबाह्य साऊंड सिस्टिम जप्त केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मिरवणुकीत साऊंड सिस्टिमच्या संख्येत छुप्या पद्धतीने वाढ करण्याचा प्रयत्न मंडळांना महागात पडण्याची शक्यता आहे.
प्रेशरमेड, प्लाझ्माला ‘नो एंट्री’
साऊंड सिस्टिमच्या संख्येवर मर्यादा आणतानाच काही विशिष्ट प्रकारच्या उपकरणांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. या उपकरणांचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच उपकरणे जप्त केली जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे केवळ बेस आणि टॉपची संख्या मोजण्यापुरती पोलिसांची भूमिका राहणार नसून, मिरवणुकीत प्रत्यक्ष कोणत्या प्रकारची ध्वनियंत्रणा वापरली जात आहे, याचीही तपासणी होण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांची भूमिका कठोर
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून डीजेविरोधात नागरिकांची स्वतंत्र मोहीम सुरू झाली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या काळात कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या त्रासाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजेवर पूर्ण बंदीची मागणी केली आहे. ‘उत्सवाला विरोध नाही; मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको’, अशी भूमिका या मोहिमेतून मांडली जात आहे. गोपाळ कृष्ण गोखले चौक परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत डीजेविरोधात आंदोलन केले होते. पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकारांच्या शिष्टमंडळानेही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साऊंड सिस्टिमसाठी निश्चित केलेली मर्यादा आणि नियमभंग झाल्यास थेट गुन्हा व जप्तीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. उत्सवाच्या नावाखाली नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना मुभा न देता नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
मंडळांवरही जबाबदारी
गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग असलेला उत्सव असल्याने मंडळांनीही पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे अपेक्षित आहे. साऊंड सिस्टिमची मर्यादा पाळणे, प्रतिबंधित उपकरणांचा वापर टाळणे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे ही मंडळांची जबाबदारी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईची जबाबदारी आयोजकांवर निश्चित केली जाईल, असा संदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे.
चार बेस आणि चार टॉपची मर्यादा ओलांडून अतिरिक्त साऊंड लावल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त केली जाईल. प्रेशरमेड आणि प्लाझ्मासारख्या प्रतिबंधित उपकरणांचा वापरही सहन केला जाणार नाही. उत्सव साजरा करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.





















