माय होम इंडिया व जनजाती कल्याण आश्रमतर्फे हूल दिनाचे स्मरण आणि क्रांतीकारकांना आदरांजली
marathinews24.com
पुणे – भारतामध्ये सगळ्यात जास्त सुसंस्कृत, सुसभ्य, शांतिप्रिय तसेच स्वत:ची संस्कृती जीवनात अंगिकारणारे जनजाती बंधू आहेत. परंतु आदिवासी समाज आजही दारिद्र्यात खितपत पडला आहे. गोरे इंग्रज गेल्यानंतर काळ्या इंग्रजांच्या गुलामीमध्ये हा समाज वाढतो आहे. या व्यतिरिक्तही भयंकर संकट त्यांच्यावर आहे, ते म्हणजे वनवासींच्या जमिनीवर बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या वस्ती वाढत आहे. लँड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे मत भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रम पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सन १८५५ साली ब्रिटिशांविरोधातील लढयात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण ‘हूल दिन’ च्या माध्यमातून करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील स्वा. सावरकर अध्यासन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनील देवधर यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे उपप्राचार्य अशोक साबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्याम भुर्के, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘वनपुण्याई’ या जनजाती कल्याण आश्रमाच्या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने संथाल जनजातीच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानी वीरांना आदरांजली वाहण्यात आली.
सन १८५५ मध्ये आताचे झारखंड आणि त्यावेळेच्या बंगाल मधील संथाल जनजातीच्या आपल्या बांधवांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक अभूतपूर्व लढा उभा केला. दिनांक ३० जून १८५५ रोजी ४०० गावातील ५०,००० पेक्षा जनजातीय बांधव एकत्र आले आणि त्यांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यामुळे ब्रिटिश बिथरले आणि त्यांनी १०,००० संथाल बंधू भगिनींना गोळ्या घालून मारले. हा दिवस हूल दिवस म्हणून ओळखला जातो.
सुनील देवधर म्हणाले, आदिवासी हा शब्द चुकीचा आहे, या जनजाती आहेत. ट्राईब हा शब्द देखील त्यांच्यासाठी चुकीचा आहे. असंस्कृत, असभ्य, क्रूर अशा अनेक प्रकारच्या मागासलेल्या लोकांना ट्राईब म्हटले आहे. त्यामुळे जनजाती हा योग्य शब्दप्रयोग आहे. हूल ही दहा हजार जनजातीच्या अत्यंत क्रूर, अमानुष हत्येची कहाणी आहे. बिरसा मुंडा यांना या हूल उठावातूनच प्रेरणा मिळाली. भारतामधला महिलांचा सगळ्यात मोठा पहिला उठाव संथाल चा होता. त्यातील वीरांगना फुलो आणि झालो मुर्मू या आजही प्रेरणा देतात. १८७६ च्या संथाल परगणा भू-हक्क कायद्यानुसार जनजातीच्या जमिनी बाहेरचा कोणी विकत घेऊ शकणार नाही हा कायदा इंग्रजांनी निर्माण केला. कायदा करायला भाग पाडणारे सगळ्यात मोठे सशस्त्र आंदोलन हे हूल क्रांती आहे.
‘हूल क्रांती’ ही एक महत्त्वाची पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेली घटना आहे. या क्रांतीने हजारो संथाल जनजाती बांधवांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला होता. या क्रांतीचे महत्त्व सर्वप्रथम समाजासमोर आणण्याचे कार्य माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले. त्यानंतर २०२३ साली नरेंद्र मोदी यांनी उपेक्षित राहिलेल्या क्रांतिकारकांना देशासमोर आणले. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संथाल जनजाती समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला उजाळा देणे आणि या वीरांचे स्मरण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असेही देवधर यांनी सांगितले.
प्रा. श्याम भुर्के म्हणाले, आदिवासींची पिळवणूक इंग्रजांकडून सुरू झाली आणि त्यातूनच ‘हूल क्रांती’चा उदय झाला. आदिवासी समाजाने पर्यावरणाचे संवेदनशीलतेने रक्षण केले; त्यांनी कधीही निसर्गाचे शोषण केले नाही. काहींचे काम मशाल घेऊन पुढे जाणारे असते, तर आदिवासींचे कार्य हे देवाच्या नंदादीपाप्रमाणे शांत, सातत्यपूर्ण आणि दीपवत मार्गदर्शक असे आहे. शरद शेळके, अशोक साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक माय होम इंडियाचे आशुतोष भिसे, जनजाती कल्याण आश्रम पुणेचे अध्यक्ष प्रकाश धोका, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.