बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

marathinews24.com

बारामती – राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्यामदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होईल. या सेंटरमधून आगामी काळात नवीन संशोधक तयार होऊन हा प्रकल्प राज्याकरिता पथदर्शी ठरेल, अशा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरअंतर्गत उभारण्यात आलेल्या टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरदचंद्र पवार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, चेअरमन राजेंद्र पवार, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर, मानद सचिव नरेंद्र शाह, माजी सचिव डॉ. अनिल मानेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनचे माजी ज्येष्ठ संशोधन अधिकारी नरेंद्र देशमुख, नेहरु युवा केंद्राचे संचालक डॉ. उमेशकुमार रस्तोगी आदी उपस्थित होते.

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल-उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्यामदतीने एकूण सहा सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर उभारण्याकरिता राज्य शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे; या सेंटरकरिता बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने सर्वप्रथम प्रस्ताव सादर केल्याबद्दल ट्रस्टचे अभिनंदन करुन श्री. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये ‘एआय’, कोडिंग, रोबोटिक्स, अंतराळ विज्ञान, पर्यावरण तंत्रज्ञान या सारख्या अत्याधुनिक विषयाची तोंड ओळख होणार असून दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

आगामी काळ हा ‘एआय’ तंत्रज्ञानाचा असून त्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य होत आहे, विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून त्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे धोरण राज्य शासनाच्यावतीने हाती घेतले आहे. शेतीमध्ये ‘एआय’च्या वापरासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून बळीराजाला याचा उपयोग झाला पाहिजे, अशी भूमिका राज्यशासनाची आहे. याचा पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे, यामध्ये त्रुटी असल्यास नागरिकांनी सुचवाव्यात, याबाबत सकारात्मक विचार करुन आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यात येईल, याकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

येत्या काळात पहिल्या टप्प्यात ‘एआय’चे १ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नव्या पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवनवीन उपक्रमात राज्य अग्रेसर व्हावे, याकरीता नवी मुंबई येथे २५० एकरात ‘नाविन्यता नगर’ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण मिळण्याच्यादृष्टीने परदेशातील ५ विद्यापीठांसोबत सामंजस्य करण्यात आला आहे.

बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्यावतीने सुरू करण्यात आलेला ‘एआय’ अभ्यासक्रम पहिल्या तुकडीने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान देण्याचे काम करण्यात येईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ.कोकोडकर यांनी टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबच्या अनुषंगाने सुचविलेल्या सुधारणा कराव्यात, अशी सूचना  पवार यांनी केली.

पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत ‘स्मार्ट शाळा’ संकल्पना अंमलात आणली असून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अभ्यासक्रम अंमलात आणण्याबाबत विचार करावा, याकरीता सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करावा, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

खासदार पवार म्हणाले, टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅब विज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन पिढीला उपयुक्त ठरेल. बारामती हे शैक्षणिक हब झाले असून परिसरातील विद्यार्थी देश विदेशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत, कृषी क्षेत्रात उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्यावतीने ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याकरिता निधीची तरतूद करण्यात आली आहे, यामुळे कृषी क्षेत्राचे अर्थकारण बदलण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.

डॉ. कोकोडकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट माध्यमातून स्थापन करण्यात आलेले सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर येथील टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅब एक पथदर्शी प्रकल्प आहे. याच धर्तीवर राज्यात इतर पाच ठिकाणी अशा प्रकारचे सेंटर उभारण्यात येणार आहे.

काळाची गरज लक्षात घेता संशोधनात्मक वातावरणात कृतीशील पद्धतीने विज्ञानयुक्त शिक्षण देण्यात यावे. प्रत्येक विद्यार्थ्यांना अनुभव, आनंद, स्फूर्ती मिळण्याच्यादृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसोबतच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसाराची क्रांती व्हावी आणि विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याकरिता अशाप्रकारचे केंद्र उपयुक्त आहे. प्रत्येक शाळेत अशाप्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, अशी सूचना डॉ. कोकोडकर यांनी केली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यवरांसोबत टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टअंतर्गत उभारण्यात आलेल्या व्हर्चुअल रियालिटी, रोबोटिक्स लॅब, सायन्स ऑन स्पिअर, होलोग्राम टेक्नॉलॉजी आदी नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी करत माहिती घेतली. सेंटरच्या प्रमुख हिना भाटिया यांनी प्रकल्पांची माहिती दिली. राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

यावेळी अंतराळ शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी विद्यानिकेतन ट्रस्ट आणि कल्पना चावला स्पेस अकादमी लोणावळा या संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. संशोधनाच्या माध्यमातून पेटंट प्राप्त प्राध्यापक, विद्यार्थ्यांचाही सत्कारही याप्रसंगी करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top