वेगवेगळ्या घटनेत २१ लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – Cyber Crime Pune : अटकेची भीती दाखविणे, तसेच वेगवेगळ्या प्रकारची बतावणी करुन सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी
बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार झाला असून, या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख २८ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Cyber Crime Pune) तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सहकारनगर भागात राहायला आहेत. अटकेची भीती दाखवून चोरट्यांनी त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहकारनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
विश्रांतवाडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला क्रेडीट कार्ड देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी सात लाखल ८० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर चोरट्यांनी एका बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. क्रेडीट कार्ड देण्याचे आमिष दाखवून बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी बँक खात्यातून सात लाख ८० हजार रुपयांची रोकड लांबविली.
सेबीतील अधिकारी असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी मुंढवा परिसरातील एका ज्येष्ठाची आठ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. सेबीतील अधिकारी असल्याची बतावणी सायबर चोरट्यांनी केली. सायबर चोरट्यांनी कागदपत्रांची पडताळणी करण्याची बतावणी केली. ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली. ही लिंक उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाइल संचाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला आहे. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून आठ लाख रुपये दुसऱ्या एका खात्यात वळविले.























