डेक्कन जिमखान्यात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी; कोरेगाव पार्क आणि हडपसरमध्येही घरफोडीच्या घटना
marathinews24.com
पुणे – Pune House Theft : सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना डेक्कन जिमखाना भागातील भांडारकर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात देवही झालेत असुरक्षित! मंदीरातील दानपेट्यांवर चोरट्यांचा डल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भांडारकर रस्त्यावरील गल्ली क्रमांक सहा परिसरातील शिवनेरी सोसायटीत राहायला आहेत. ६ ऑक्टोबर रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय हे सदनिका बंद करुन बाहेर गेले. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. (Pune House Theft) शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच दुचाकीची चावी चोरुन नेल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी दुपारी उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक मिसाळ तपास करत आहेत.
कोरेगाव पार्क परिसरात चोरी
कोरेगाव पार्क परिसरातील मीरानगर सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील चांदीची नाणी चोरुन नेली. चोरट्यांनी चांदीची ३० नाणी चोरुन नेली असून, चोरलेल्या नाण्यांची किंमत ८० हजार रुपये आहे. याबाबत एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.
हडपसर भागातील हांडेवाडी परिसरातील एका कपडे विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी शर्ट-पँट चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरलेल्या मुद्देमालाची किंमत ५० हजार रुपये आहे. याबाबत कपडे विक्री दुकानाच्या मालकांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.























