पुण्यात मंदिरांच्या दानपेट्या चोरट्यांच्या निशाण्यावर
marathinews24.com
पुणे – Pune Temple Theft : शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात असलेल्या देवळातील देवही आता सुरक्षित राहत नसल्याचे दानपेटी चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी थेट मंदिराच्या दानपेट्या कडे मोर्चा वळविला आहे. विशेषतः वर्दीळीसह गजबजलेल्या कसबा गपणती मंदीरातील चोरीच्या घटनेमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रामुख्याने पोलिसांकडून रात्रगस्तीसह महत्वाच्या ठिकाणांवरील पेट्रोलिंगला खो दिल्यामुळे अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. एकीकडे दिवसाढवळ्या घरफोडी करणारे अॅक्टिव्ह झाले असतानाच मंदीरातील दानपेट्याही सुरक्षित राहिल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
धर्मांतरासाठी तृतीय पंथीयावर दबाब; धमकावून साडेसहा लाखांची लूट – सविस्तर बातमी
मध्यवर्ती भागासह उपनगरात रात्रीच्या सुमारास मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी करणे, दानपेटी पळवून नेण्याच्या घटनांमुळे नागरिकांची आस्था दुखावत चालली आहे. ग्रामदैवत असलेल्या मध्यवर्ती कसबा पेठेतील गणपती मंदिरातील दानपेटीतील रोकडवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना मंगळवारी (दि.६ ऑक्टोबरला) मध्यरात्री घडली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या बढाया मारणार्या परिमंडळ एकच्या हद्दीसह फरासखाना पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः रात्रपाळीला असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी, बीट मार्शल, गुन्हे शाखेच्या पथकांच्या कामालाही चोरीमुळे बट्टा लागला आहे. दरम्यान, चोरीचा प्रचंड गाजावाजा झाल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. संग्राम राजेंद्र जाधव (वय २९ रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
एकीकडे पीएमपीएल बसमध्ये महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे, दुचाकीस्वारांच्या धुडगूसामुळे महिलांच्या सुरक्षिततेचे तीनतेरा झाले आहेत. त्यासोबतच सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले आहे. (Pune Temple Theft) लुटमार, चोर्या, चेनस्नॅचिंगचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, एकीकडे नागरिकांचे फ्लॅट फोडले असतानाही, आता देवही सुरक्षित राहिले जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यातच घोरपडे पेठेतील घोरपडे उद्यानाच्या आवारात असलेल्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याचा प्रकार १८ सप्टेंबरला घडला आहे. घोरपडे पेठेतील श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यानाच्या आवारात श्री शिव मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या आवारातील दानपेटीचे कुलूप तोडले. दानपेटीतील साडेपाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.
औंध परिसरातील ऋषिकेश धाम सोसायटीतील शिवदत्त गणेश मंदिराची दानपेटी फोडून चोरांनी त्यातील पैसे चोरून नेले. ही घटना ७ ऑगस्टला घडली आहे. ऋषिकेश धाम सोसायटीतील शिवदत्त गणेश मंदिराची दानपेटी फोडून चोरांनी त्यातील १४ ते १५ हजार रुपये लांबवले. (Pune Temple Theft) याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर फुरसुंगीतील साजाईमाता मंदिराची दानपेटी फोडून चोरट्याने ८ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही फुटेजचा ५ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला. पहाटेच्या सुमारास झालेल्या चोरीत १३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना २९ ऑगस्टला घडली आहे. चोरट्यावर फुरसुंगी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्याने कामठे मळा येथील साजाईमाता मंदिरात प्रवेश करुन दानपेटी फोडली. त्यामधील आठ हजार रुपयांची रोकड चोरली. चोरी करताना आपली ओळख उघड होऊ नये, यासाठी चोरट्याने सीसीटीव्ही फुटेज साठवणारा डीव्हीआर चोरुन नेला होता.
आस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
मंदिरातील दानपेटीतील ऐवज चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती परिसरात कसबा पेठ, औंध, फुरसुंगी परिसरातील मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह गुन्हे शाखा, रात्रगस्त, हद्दीतील बीट मार्शलांना जागे करण्याची गरज आहे.























