दोघांची १ लाख ४४ हजारांची केली फसवणूक
marathinews24.com
पुणे – शहरातील नागरीकांना सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले असून, विविध आमिष दाखवून फसवणूक केली जात आहे. गॅस बिल भरले नाही तर गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत सायबर चोरांनी दोघांती १ लाख ४४ हजार ६०३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी मार्केटयार्ड आणि नऱ्हे पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात चोरीच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी
पहिल्या घटनेत, सायबर चोरांनी बिबवेवाडी-कोंढवा रोड, मार्केटयार्ड येथील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फोन करून, तुमच्या गॅसचे बील भरले नाही तर, ते गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल अशी भीती दाखवली. तसेच व्हॉट्सअप वर बील न भरल्याबाबतची नोटीस पाठवली. त्यामध्ये लिंक होती. ज्येष्ठ नागरिकाने लिंक क्लिक करून क्रेडिट कार्डद्वारे बील भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यातून २९ हजार रुपये डेबिट झाले. ९ एप्रिल रोजी ही घटना घडल्यानंतर ज्येष्ठाने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात जात सायबर चोरांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नवले करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, नऱ्हे, धायरी रोड येथील ४५ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरांनी ९ एप्रिल रोजी गॅस बील भरण्याचे सांगत एक एपीके फाईल पाठवली. त्यांनी ती लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार ५८७ रुपये डेबिट झाले. यानंतर तक्रारदाराने नऱ्हे पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस कर्मचारी सोनकांबळे करत आहेत.
जास्त परताव्याचे आमिष; ३६ लाखांची फसवणूक
पुणे- शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवत सायबर चोरांनी एकाची ३६ लाख ६३ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विमाननगर येथील ४६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी ते २३ मार्च २०२६ या कालावधीत सायबर चोरांनी तक्रारदार महिलेला फोन करून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते. सायबर चोरांवर विश्वास ठेवत महिलेने ३६ लाख ६३ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) शेळके करत आहेत.





















