स्वामी चिंचोलीत चोरट्यांचा धुमाकूळ
marathinews24.com
पुणे – Daund Farmer Theft News : जिल्ह्याभरात दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावात एकाच रात्रीत तब्बल १२ शेतकर्यांचे विद्युत पंप फोडण्यात आले. त्यातील महागडी तांब्याची तार चोरुन चोरट्यांनी पलायन केले आहे. एकीकडे हाताशी आलेल्या पिकांना पाणी देण्याची वेळ आली असतानाच, महिन्यात सलग दुसर्यांना चोरट्यांनी विद्युत पंपाची चोरी केली आहे. त्यामुळे शेतकर्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, चोरट्यांना पकडण्याचे आव्हान दौंड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
फ्लॅटचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी
स्वामी चिंचोली परिसरातील संत तुकारामनगर परिसरात असलेल्या शेतकर्यांच्या विद्युत पंपाची चोरी करण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केल्याचे शेतकर्यांना दिसून आले. सध्यस्थितीत कांदा, उस, गहू, हरभरा पिकांना पाणी द्यायची शेतकर्यांची लगबग सुरु आहे. त्यातच चोरट्यांनी एकाच रात्रीत १२ शेतकर्यांच्या विहीर, शेततळ्यावरील विद्युत पंप फोडून त्यातील महागडी तांब्याची तार चोरुन नेली. ३१ ऑक्टोबरला चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर शेतकर्यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, सततच्या होणार्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन शेतकर्यांनी केले आहे.
महिन्याभरात दुसरी घटना, दरवेळी १० हजारांचा भुर्दंड
दिवसा विद्युत पंपाची रेकी केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित टोळके चोरी करीत आहेत. महिन्याभरात विद्युत पंप चोरीची दुसरी घटना असून, यापुर्वीही ८ ते १० जणांच्या विद्युत मोटारी चोरून नेल्या होत्या. (Daund Farmer Theft News) त्यासोबत केबल आणि इतर साहित्यही चोरी केले जात आहे. दरम्यान, एका विद्युत पंप दुरुस्तीसाठी शेतकर्यांना नव्याने १० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती असताना शेतकर्यांचे विद्युत पंप चोरीच्या घटनांमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या शेतकर्यांच्या विद्युत पंपाची झाली चोरी
श्रीकांत माने, गणपत वाकळे, जर्नादन वेताळ, आप्पासाहेब वेताळ, माउली नहाणे, शरद काळभोर, राजेंद्र थोरात, तुकाराम वाकळे, रामचंद्र पानसरे, दिलीप वेताळ, मालचंद कदम, दादा पाटील या शेतकर्यांच्या रानातून विद्युत पंपाची चोरी झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी आम्ही दिवस-रात्र मेहनत करतो. मात्र, महावितरणकडून विद्युत पुरवठा बंद असल्याची संधी साधून चोरट्यांचे टोळके एकाचवेळी अनेक शेतकर्यांचे विद्युत पंप चोरुन नेत आहेत. यापुर्वीही मागील महिन्यात अशीच घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा विद्युतपंप दुरुस्तीसाठी १० हजारांवर खर्च पेलवेनासा आहे. आम्ही दिवाळी साजरी करायची का नाही, असा प्रश्न आहे.
गणपत वाकळे, बागायतदार, स्वामी चिंचोली, दौंड























