पावसाळ्यापूर्वी धोका टाळा, पुणे पोलिसांचा इमारती पाडण्याचा आदेश
marathinews24.com
पुणे – शहरातील ज्या इमारती ‘धोकादायक’ घोषित केल्या आहेत, त्या पावसाळ्यापूर्वी पाडण्यात याव्यात. त्याठिकाणी राहणार्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन करावे. जेणेकरून जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येईल, अशा स्पष्ट सूचना पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मान्सून पावसाच्या आगमनापूर्वी पुणे पोलिस आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाची बैठक गुरूवारी (दि. ८) पार पडली. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी, दोन्ही विभागांच्या अधिकार्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत विविध मुद्दयांवर चर्चा झाली.
वेल्डिंगचे काम करताना कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी
पुणे शहरात २५० हून अधिक इमारती महापालिकेने ‘धोकादायक’ घोषित केल्या आहेत. त्यापैकी अनेक इमारती ३० ते ५० वर्षे जुन्या असून, त्यांना भेगा, झुकलेल्या भिंती आणि जीर्ण छत झाले आहेत. मात्र, तरीही स्थानिक नागरिक अजूनही जुन्याच इमारतींमध्ये राहत आहेत. त्यामुळे जर त्या इमारती वेळेत रिकामी करून पाडल्या नाहीत, तर येत्या पावसाळ्यात पुण्यातही मुंबईसारखे अपघात घडू शकतात, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत पावसाळ्यात दोन इमारती कोसळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर अशा अपघातांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाने प्राधान्य देण्याचे बैठकीत ठरले आहे.
रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना राबवा
धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या लोकांच्या पुनर्वसनासाठी ठोस योजना आखावी, असा निर्णयही बैठकीत घेतला आहे. प्रत्येक भागात तात्पुरते पुनर्वसन केंद्रे स्थापन करावीत, जिथे या नागरिकांना काही महिन्यांसाठी स्थलांतरित करता येईल. यासाठी स्थानिक शाळा, सामुदायिक इमारती आणि भाड्याने घेतलेली घरे वापरली जाऊ शकतात, अशा कल्पना पोलिसांनी दिल्या आहेत. दरम्यान, इमारतीच नाही तर पावसाळ्यात होर्डिंग्जसह झाडे उन्मळून पडल्यामुळे जीवितहानीसह मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे शहरातील सर्व होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल स्थिरतेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. होर्डिंग्ज लावणार्या एजन्सींना नोटिसा पाठवून त्यांना ताकदीचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जाणार आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याच्या ८० हून अधिक घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले होते आणि वाहतूक विस्कळीत झाली होती. अशा दुर्घटना टाळण्यासाठाी यावषी महापालिकेकडून जुनी झाडे तोडण्यासह छाटणी केली जाणार आहे.
पुण्यात पाणी साचण्याची १०५ ठिकाणे, पंप बसवण्याची शिफारस
शहरातील १०५ ठिकाणी पाणी साचण्याची समस्या गंभीर आहे. मागील वर्षी पावसाळ्यात संबंधित ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला होता. यावर्षी संंबंधित भागात पंप बसवण्याचे आणि ड्रेनेज साफ करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पावसात पुण्यातील कात्रज, सिंहगड रोड, वारजे, बिबवेवाडी, नाला सोपारा, मुंढवा आणि कोरेगाव पार्क यासारख्या भागात पाणी साचले होते.
नदीकाठावरील अतिक्रमण हटवणार
धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे मागील वर्षी नदीकाठावरील स्टॉल वाहून गेले होते. त्यावेळी महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नागरिकांना वेळेवर सतर्क करता आले नाही, असा आरोप पोलिसांनी केला होता. त्यापार्श्वभूमीवर यंदा नदीकाठवरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सतर्क करण्यासाठी एसएमएस आणि लाऊडस्पीकर अलर्ट सिस्टम तयार केली आहे. पोलिस विभागाने महानगरपालिकेला संपूर्ण कृती आराखडा सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये इमारती पाडण्याची प्रक्रिया, नागरिकांचे पुनर्वसन, ड्रेनेज, वृक्ष छाटणी, होर्डिंग ऑडिट आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली यांचा समावेश आहे.