पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश
marathinews24.com
पुणे – सराइतांकडून किरकोळ स्वरुपाचे गु्न्हे दाखल केले जातात. अशा प्रकारचे गुन्हे अदखलपात्र स्वरुपात (नाॅन काॅग्निजेबल ऑफेन्स- एनसी) मोडतात. सराइताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यास त्यातील बारकावे तपासून गुन्हेगारांना मोकळे न सोडता त्यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. दखलपात्र गुन्हे दाखल केल्यास सराइतांविरुद्ध भविष्यात करण्यात येणारी कारवाई परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
‘शहरातील गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडाविरुद्ध कारवाईसाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
पुण्यात भाजप कडून पाकिस्तानचा झेंडा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध – सविस्तर बातमी
शहरातील ३७ हजार सराइतांचे वास्तव्याचे ठिकाण, त्यांचे नातेवाईक, तसेच अन्य माहिती संकलित करण्याचे काम सुुरू करण्यात आले आहे. गुन्ह्यांचे स्वरुप विचारात घेऊन ३७ हजार सराइतांची माहिती १५ विभाग करुन संकलित करण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार ४०० गुंड पोलिसांच्या यादीत (टाॅपलिस्ट) आहेत. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला गुन्हेगारांची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सराइतांची यादी देण्यात आली आहे. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.
‘बऱ्याचदा सरइतांकडून किरकोळ स्वरुपाचे गुन्हे केले जातात. नागरिकांना धमकावले जाते. त्यांना मारहाण केली जाते. अशा प्रकारचे गुन्हे अदखलपात्र स्वरुपात (नाॅन काॅग्निजेबल ऑफेन्स) स्वरुपात मोडतात. अशा प्रकारचे गुन्हे तपासून सराइतांविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगाराविरुद्ध दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्यास त्याच्याविरुद्ध भविष्यात ‘एमपीडीए’ (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा), ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा), तसेच तडीपारीची कारवाई अधिक परिणामकारक पद्धतीने करता येईल’, असे बलकवडे यांनी नमूद केले.
तडीपार गुंडावर नजर
दहशत माजविणाऱ्या गुंडाना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले जाते. तडीपार केल्यानंतर सराइत पु्न्हा शहरात वास्तव्यास येत असल्यचो आढळून आले. गेल्या तीन वर्षात जवळपास ८०० गुंडांनी तडीपारीचा आदेश भंग केल्याचे आढळून आले आहे. तडीपार केल्यानंतर शहरात वावरणाऱ्या गुंडाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
गुंडांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन
शहरातील वस्ती भागातील नागरिक, व्यापाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार घडतात. गुंडांनी धमकाविल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी केले आहे. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, तसेच त्यांना आधार देण्यासाठी वस्ती भागात पोलिसांनी बैठका घेऊन मार्गदर्शन करावे, अशा सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.