लोकशाही बचाव आंदोलनात महिला खासदाराला चापट मारल्याचे प्रकरण
marathinews24.com
पुणे – Dr Neelam Gorhe Congress Statement : लोकशाही वाचवण्याच्या घोषणा देणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनातच महिला खासदाराच्या सन्मानाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या एका महिला खासदाराच्या गालावर त्यांच्याच पक्षातील पुरुष खासदाराने चापट मारल्यासारखी कृती केल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत = सविस्तर बातमी
‘बहिणीसारखी आहे’ असे सांगून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कृतीचे समर्थन कसे करता येईल? महिला लोकप्रतिनिधींवर ‘तोंड दाबून चापट सहन करा’ अशी वेळ येता कामा नये, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. संबंधित महिला एकल असो किंवा विवाहित, तिच्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचा विचार न करता तिचा सन्मान राखला गेला पाहिजे. कै. बाळूभाऊ असते तर अशा वर्तनाचे धाडस झाले असते का, Dr Neelam Gorhe Congress Statement असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीवर टीका करताना डॉ. गोऱ्हे यांनी नैना साहनी तंदूर हत्याकांड आणि लातूरमधील कल्पना प्रकरणाचा संदर्भ दिला. महिलांच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत महिलांच्या कष्टाला, सामाजिक सहभागाला आणि सन्मानाला महत्त्व देण्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, संबंधित महिला खासदारांनी चापट मारल्याचा आरोप नाकारला असून संबंधित प्रसंगाचा संपूर्ण संदर्भ तपासणे आवश्यक आहे. मात्र, महिला सन्मान हा केवळ राजकीय घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष वर्तनातून दिसला पाहिजे, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.




















