पोलीस प्रशासनाची दिरंगाई आणि रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्ष व दुटप्पी भूमिकेबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी
marathinews24.com
मुंबई – बॉम्बे रूग्णालय, मुंबई येथे महिला कर्मचाऱ्यांवरील झालेल्या अत्याचार प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीमध्ये डॉ. गोऱ्हे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर चर्चा करताना त्यांनी स्पष्ट केले की, आरोपीवर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई केली जावी आणि चार्जशीट दाखल करण्यात यावे. तसेच, “महिला कर्मचाऱ्यांना या प्रकरणी जर कुणी धमकी दिली, त्रास दिला किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात प्रथम – सविस्तर बातमी
डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाच्या दिरंगाईच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देताना त्यांनी म्हटले की, “वेळ पडल्यास व्यवस्थापनातील दोषी अधिकाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यास अजिबात कसूर करू नये.” तेथील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून कंत्राटी पद्धतीवर येणाऱ्या या महिलांचे व्यवस्थापनाकडून शोषण होणार नाही याची पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
विशाखा समितीचे सक्षमीकरण, कर्मचाऱ्यांची तक्रार नोंदविण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करणे, खोट्या केसेस निर्गत करणे, भरोसा सेल कार्यान्वित करून दर्शनी भागात अधिकारी यांचे नाव मोबाईल नंबर जाहीर करणे, प्रतिबंधात्मक कारवाईसह आरोपींविरुद्ध तत्काळ चार्जशीट दाखल करणे याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या. अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
बैठकीत महिला कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न मांडले, त्यावर तातडीने न्याय मिळवून देण्याची हमी डॉ. गोऱ्हे यांनी दिली. तसेच, महिला सुरक्षेसाठी रुग्णालय प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास आरोग्य विभागाने त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी याबाबत आरोग्य विभागास सूचना दिल्या. यावेळी बैठकीस माजी विधानपरिषद सदस्य किरण पावसकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, सह पोलीस आयुक्त लखमी गौतम, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. पुजा सिंह यांच्यासह रुग्णालय महिला कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.