तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस – महानगरपालिकेची संयुक्त मोहीम
marathinews24.com
पुणे – शहरात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला वाचवण्यासाठी पुणे पोलीस व महानगरपालिकेच्यावतीने ड्रग मुक्त पुणे अभियान राबविण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते “ड्रग मुक्त प्रभाग– ड्रग मुक्त पुणे” या जनजागृती अभियानाचा शुभारंभ बिबवेवाडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात करण्यात आला. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, संजय पाटील, राजेंद्र बनसोडे, मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, स्थायी समितीचे चेअरमन श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून गणेश शिंदे यांनी खुमासदार शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. ड्रग्जच्या वाढत्या विळख्याचे भीषण वास्तव त्यांनी मांडले. विद्येच्या माहेरघरात ड्रगमुक्तीबाबत जनजागृती करण्याची वेळ येणे, हे समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक सत्य आहे,” असे सांगत त्यांनी पालकांना थेट प्रश्न विचारले. मुलगा किंवा मुलगी नेमके कोणासोबत फिरतात, काय करतात, कोणत्या संगतीत असतात हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कुटुंब प्रमुख म्हणून आपण आपल्या पाल्यांशी रोज संवाद साधतो का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पालकांनी मुलांना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली. आतापासून आपल्या मुलांकडे अधिक लक्ष द्या. त्यांच्या मित्रपरिवाराची माहिती ठेवा. परिसरात कोणी संशयास्पद हालचाली करत असेल, ड्रग्ज विक्री किंवा सेवन करत असल्याची माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन केले.
ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबे पूर्णपणे बरबाद झाली आहेत. “आयुष्य खूप सुंदर आहे. चुकीच्या मार्गाला लागून ते नष्ट करू नका. आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा, समाजासाठी चांगले काम करा आणि सकारात्मक आयुष्य जगा.”
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्जविरोधात कठोर भूमिका स्पष्ट केली. “ड्रग विकणाऱ्यांनाच नाही तर सेवन करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही. येत्या दोन महिन्यांत हा प्रभाग ड्रगमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे. मात्र यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे ते म्हणाले. ड्रग्ज फ्री पुणे या विशेष मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांनी पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले. “माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्थायी समितीचे चेअरमन श्रीनाथ भिमाले यांनीही या मोहिमेस पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. “महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पीटीपी अॅप डाउनलोड करून पोलिसांना माहिती देण्याची सवय लावावी. तरुण पिढी वाचवण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. नगरसेविका सिद्धी शिळीमकर यांनी उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी आणि नागरिकांचे आभार मानले. उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या विशेष प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.






















