कोंढवा परिसरात घडली घटना
marathinews24.com
पुणे – शहरातील कोंढवा परिसरात अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पोलीस पकडण्यासाठी गेले असताना झालेल्या झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. त्याच्या शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून अहवालनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
माॅडर्न कॅफेजवळील दुचाकीस्वाराला लुटले – सविस्तर बातमी
अझीम अबू सालेम उर्फ अझीम खान (वय ५१, रा.मीरा -भाईंदर) असे मरण पावलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी, कोंढवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मीरा भाईंदर पोलिसांचे पथक कारवाई करत असताना हा प्रकरणे घडला. उच्च रक्तदाबामुळे या गुन्हेगाराचा मृत्यू झाला, असे प्राथमिक पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.
आरोपी अझिम याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील काशीगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका मेफेड्रोन विक्री प्रकरणात मीरा-भाईंदर पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये त्याची शोधाशोध केली. तो पुण्यात कोंढवा परिसरातील कौसरबागमध्ये असल्याची माहिती तेथील पोलिसांना समजली. त्यानुसार, त्यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोंढवा पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली. कोंढवा पोलिसांसमवेत मीरा भाईंदरचे पथक अझीम याच्या घरी पोचले.पोलिसांनी बराच वेळ दार ठोठावले. पण, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी खान पोलिसांवर झेपावला व त्याने एका कॉन्स्टेबलच्या छातीत चावा घेतला.
त्यावेळी पोलिसांनी त्याला दूर ढकलले. यावेळी झालेल्या गोंधळात खान अचानक बेशुद्ध पडला आणि जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तो मरण पावला असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. ही सदनिका अझीम याच्या मैत्रिणीची असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे, अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिली.





















