चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील शिवाजीनगर भागातील माॅडर्न कॅफेजवळ असलेल्या भुयारी मार्गात दुचाकीस्वाराला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील दोन मोबाइल हिसकावून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. दुचाकीस्वाराने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एनआयएकडून चौकशीची घातली भीती; ज्येष्ठाची दीड कोटीची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २० वर्षीय तरुण कोंढवा भागात राहायला आहे. दुचाकीस्वार तरुण १६ ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगर भागातील माॅडर्न कॅफेजवळ (स. गो. बर्वे चौक) असलेल्या संत मोरया गोसावी भुयारी मार्गातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले आणि अपघात झाल्याची बतावणी केली. चोरट्यांनी त्याच्याकडे भरपाई देण्याची मागणी करुन धमकाविण्यास सुरुवात केली. तरुणाला बोलण्यात गुंतविले. त्याच्यकडील ३७ हजारांचे दोन मोबाइल संच हिसकावून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.
स्वारगेट, स्टेशन परिसरात मोबाइल हिसकावले
शहरातील स्वारगेट आणि पुणे स्टेशन परिसरात दोघांचे मोबाइल हिसकावून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी स्वारगेट आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात थांबलेल्या एका तरुणाच्या हातातील ४० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार तरुण मूळचा सोलापूरचा आहे. तो ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास स्वारगेट स्थानकासमोर थांबला होता. त्यावेळी दोन चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक निकीता पवार तपास करत आहेत. पुणे स्टेशन परिसरात तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करत आहेत.
बुलेट्स्वारांनी मंगळसूत्र हिसकावले
बुलेटस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५७ वर्षीय महिला लोणीकंद भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी पावणेचारच्या सुमारास लोणीकंदमधील थेऊर फाटा परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी बुलेटवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करत आहेत.




















