आकडेवारीत गुन्हे घटले, मग भीती का वाढली?
marathinews24.com
पुणे – शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा पोलिस आयुक्तांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली ‘गुन्हेगारीची कीड’ अधिकच फोफावत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आकडेवारीत घट दिसत असताना नागरिकांच्या मनातील भीती मात्र वाढत असल्याचे नमूद करत सुळे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
विषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावा – सविस्तर बातमी
पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करणारे पत्र सुळे यांना पाठविले होते. या पत्राला उत्तर देताना सुळे यांनी पोलिसांच्या आकडेवारीपेक्षा नागरिकांचा अनुभव अधिक महत्त्वाचा असल्याचे ठामपणे नमूद केले आहे.
सुळे यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्र पोलिस दलाबद्दल आदर व्यक्त करताना, पोलिसांच्या कामगिरीवर टीका करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र पुणे शहरात सातत्याने घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुन्हेगारीच्या घटनांची संख्या हा एक निकष असला, तरी त्यातील क्रौर्य, उघडपणे होणारे हल्ले आणि वाढती दहशत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
म्हाळुंगे येथील बालकाच्या हत्येपासून ते हडपसरमध्ये सापडलेल्या बॉम्बसदृश वस्तूपर्यंत अनेक घटनांचा उल्लेख करत सुळे यांनी शहरातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. नांदे गावातील भरदिवसा झालेली कोयत्यांची दहशत, दिवे घाटातील टोळक्यांचा हैदोस, रिक्षाचालकावर झालेला प्राणघातक हल्ला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि दिवसाढवळ्या झालेले खून या घटनांनी पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.
पोलिस आयुक्तांनी सादर केलेल्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत सुळे म्हणाल्या की, गुन्हे कमी झाल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी नागरिकांना ते वास्तव वाटत नाही. “आकडेवारी आणि जनतेचा अनुभव यांच्यात एवढी तफावत का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मनात भीती असेल तर पोलिस आणि जनतेमधील संवादात काहीतरी कमी पडत असल्याचे ते लक्षण असल्याचेही त्यांनी म्हटले.
शहरात जमावबंदीचे आदेश लागू करावे लागत असताना गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचा दावा कसा करता येईल, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला. तसेच “शहराविषयी नकारात्मक नरेटिव्ह तयार केला जात आहे” या पोलिस आयुक्तांच्या विधानावरही त्यांनी आक्षेप घेतला. जर कोणी हेतुपुरस्सर चुकीचे चित्र उभे करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा सवाल त्यांनी विचारला.
गोळीबाराच्या एका घटनेत पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे कौतुक करतानाच, गुन्हा घडल्यानंतरची नव्हे तर गुन्हा घडण्यापूर्वीची प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञानासोबतच रस्त्यावर पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि शांततेचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक चिंतेचा विषय असल्याचे सुळे यांनी पत्रात नमूद केले. पुणेकरांचा पोलिस आणि व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी अधिक कठोर, प्रभावी आणि दृश्यमान उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुळे यांचे चार थेट सवाल
▪️ गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा असेल, तर पुणेकरांच्या मनात भीतीचे वातावरण का?
▪️ गुन्हे नियंत्रणात असताना शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्याची गरज का भासली?
▪️ शहराविषयी चुकीचा ‘नरेटिव्ह’ तयार होत असेल, तर संबंधितांवर कारवाई का नाही?
▪️ गुन्हा घडल्यानंतरच्या कारवाईपेक्षा गुन्हा रोखण्यासाठी पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढणार कधी?





















