Breking News
पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खूनगुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्याब्राऊन शुगरची विक्री प्रकरणात दोघे अटकेत

विषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचे

सीआयडीने थेट लोकांशी संपर्क करणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात मृत्यूंचा आणि बाधितांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) कार्यालयाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे यांनी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक शफकत आमना, पोलीस उपअधीक्षक सचिन चव्हाण आणि शामराव काळे यांच्याशी सुमारे ३५ मिनिटे चर्चा केली. यावेळी तपासातील काही त्रुटी, स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि पुढील तपासाची दिशा याबाबत त्यांनी अनेक सूचना मांडल्या.

पत्रकारांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “ज्या व्यक्तींचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला, त्यांच्याबरोबरच त्या काळात तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांचाही शोध घेणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे. त्याचबरोबर त्या कालावधीत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नोंदींचीही तपासणी केली जावी.”

त्यांनी सांगितले की, काही व्यक्ती आजारी पडल्यानंतर किंवा मृत्यूनंतर त्यांच्या मूळ गावी परतल्या असण्याची शक्यता आहे. कर्नाटक, लातूर, बिहारसह इतर राज्यांत गेलेल्या व्यक्तींची माहितीही गोळा केली पाहिजे. “दूरदर्शन, प्रसारमाध्यमे आणि स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून आवाहन करून अशा व्यक्तींबाबतची माहिती नागरिकांनी प्रशासनाला द्यावी. काहींना मुद्दामहून गायब करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचाही तपास व्हायला हवा,” असे त्यांनी नमूद केले.

सीआयडीचे संपर्क कार्यालय सुरू करण्याची मागणी

तपासादरम्यान नागरिकांना निर्भयपणे माहिती देता यावी यासाठी पिंपरी-चिंचवड आणि हडपसर येथे सीआयडीचे तात्पुरते संपर्क कार्यालय सुरू करण्याची सूचना आपण केली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे व्हॉट्सॲप क्रमांक सार्वजनिक करावेत, जेणेकरून नागरिक थेट तक्रारी आणि पुरावे सादर करू शकतील, अशी मागणी त्यांनी केली.

“पूर्वी नागरिकांनी काही निवेदने दिली असतील आणि त्यावर कारवाई झाली नसेल, तर ती माहितीही सीआयडीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे प्रशासनातील हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष कोठे झाले हे स्पष्ट होण्यास मदत होईल,” असे त्या म्हणाल्या. हडपसर, फुगेवाडी आणि इतर काही भागांमध्ये नागरिकांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “लोकांना घाबरविणाऱ्या किंवा तपासात अडथळे निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. काही निलंबित पोलीस अधिकारी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे त्याबाबतही खबरदारी घेण्याची सूचना मी अधिकाऱ्यांना केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्पादन शुल्क विभागासह सर्व यंत्रणांची नैतिक जबाबदारी

उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या कामकाजाबाबत विचारलेल्या प्रश्नावर डॉ. गोऱ्हे यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाकडे यापूर्वीपासून अवैध हातभट्टी आणि विषारी दारूच्या व्यवसायाची माहिती होती, तसेच संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही अशा प्रकारची मोठी दुर्घटना घडल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी सूचित केले. “केवळ कारवाई दाखविणे पुरेसे नसते, तर त्या कारवाईचे परिणाम प्रत्यक्षात दिसणेही आवश्यक असते. पूर्वी माहिती असूनही जर अवैध दारूचे जाळे सुरू राहिले असेल, तर त्यामागे नेमकी कुठे त्रुटी राहिली याची चौकशी झाली पाहिजे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

या प्रकरणात उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन अशा सर्वच संबंधित यंत्रणांच्या भूमिकेची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर जबाबदारी निश्चित करून कोणाकडून हलगर्जीपणा झाला, कोणत्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध माहितीवर वेळेत कारवाई केली नाही आणि कोणत्या कारणांमुळे अवैध व्यवसाय वाढत गेला, याचा सखोल शोध घेणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ प्रशासनाच्या पातळीवर गांभीर्याने हाताळला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मी सर्व माहिती दिली आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

अधिवेशनातही मुद्दा उपस्थित करणार

२२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा विषय जोरदारपणे मांडला जाईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. “अनेक आमदार या प्रकरणाची पाहणी करत आहेत. पिंपरी-चिंचवड भागात प्रशासनाची हालचाल दिसते; मात्र हडपसर भागात काही प्रमाणात शिथिलता जाणवते,” अशी टीकाही त्यांनी केली.

मदत जाहीर; प्रत्यक्ष लाभाची प्रतीक्षा

महापालिकेने बाधित कुटुंबांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली असली तरी अनेक कुटुंबांपर्यंत ती अद्याप पोहोचलेली नसल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “समाजातील काहीजण मदतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत; मात्र मृत व्यक्तींची कुटुंबे ही दारूच्या व्यसनाची नव्हे, तर त्या दुर्घटनेची बळी ठरलेली आहेत. त्यांना आधार दिला तरच ते पुढे येऊन साक्ष देतील आणि दोषींना शिक्षा होण्यास मदत होईल,” असे त्या म्हणाल्या. सरकारने मृत्यूंची वास्तव संख्या स्वीकारून सर्व प्रभावित कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवावी, अशी मागणी करत नागरिकांनीही कोणतीही माहिती लपवू नये आणि तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×