महिलेविरुद्ध कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख अभियंत्याला महागात पडली आहे. विवाहाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अभियंत्याने फिर्याद दिली आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभियंत्याची २०२१ मध्ये विवाहविषयक संकेतस्थळावरुन महिलेशी ओळख झाली होती. महिलेने त्याला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. पेट्रोल पंप सुरू करायचा असून, त्यासाठी पैशांची गरज आहे. हा व्यवसाय भागीदारीत सुरू करु, असे महिलेने त्यांना सांगितले. त्यानंतर अभियंत्याने महिलेच्या खात्यात वेळोवेळी १ कोटी ११ लाख रुपये जमा केले. त्यानंतर महिलेकडे त्यांनी व्यवसायबाबत विचारणा केली.
तेव्हा तिने पेट्रोल पंप सुरू करण्यास परवाना मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप परवाना, तसेच जमीन मिळाली नाही, असे तिने सांगितले. अभियंत्याला संशय आल्याने त्यांनी पैसे परत करण्याबाबत विचारणा केली. तेव्हा महिलेने त्यांना १३ लाख १८ हजार रुपये परत दिले. उर्वरित पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. कोंढवा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.






















