चार्याच्या आशेने गाईने थेट इमारतीचा दुसरा मजला गाठला
marathinews24.com
पुणे – शाब्दिक कोटी करण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरू शकत नाही. खवचटपणा आणि अंगअंगात भिनलेले वाकचातुर्य अनेकांना घायाळ करून सोडते. मात्र, आता शहरातील जनावरांचाही नाद करायचा नाही, अशीच घटना रविवार पेठेतील कापड गल्लीत घडली आहे. एका गाईमुळे अग्निशमक दलाच्या जवानांना घटनास्थळी पाचारण करावे लागले. चार्याच्या आशेने गाईने थेट इमारतीचा दुसरा मजला गाठला. मात्र, त्यानंतर तिला खाली उतरायला येत नव्हते. अखेर स्थानिक नागरिकांनी अग्निशमक दलाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.
चेंगळ्या बोले कुहू…रस प्यायला ये म्हणलं माय… सोशल मीडियावर धुमाकूळ – सविस्तर बातमी

पुण्यातील रविवार पेठ नेहमीच वर्दळीचा परिसर असून, दाग-दागिन्यांसह गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी झुंबड असते. शुक्रवारी दि.१६ मात्र, कापड गल्लीत भलताच प्रकार घडला. फिरस्त्या गाईने चार्याच्या आशेने थेट इमारतीचा दुसरा मजला गाठला. त्याठिकाणी रहिवाशांनी गाईचे दर्शन घेत तिला भाकरी खाउ घातली. मात्र, पायर्यांवरून पुन्हा खाली उतरताना गाईची मोठी पंचायत झाली. तिला खाली उतरताना अडचण निर्माण झाली. कसेही प्रयत्न केले तरीही गाईला खाली उतरता येत नसल्यामुळे तिने हंबरडा फोडला. त्यामुळे घाबरलेल्या स्थानिक रहिवाशांनी अग्निशमक दलाला फोन करून आमच्या इमारतीत गाई चढली आहे. तुम्ही तातडीने या, अन गाईला खाली उतरवा अशी विनंती केली.
नागरिकांच्या कॉलनुसार अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कापड गल्लीतील इमारतीच्या दुसर्या मजल्यावर काळ्या रंगाची गाई जोरजोरात हंबरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जवानांनी डोक्यावर हात मारून घेत, गाई दुसर्या मजल्यावर गेलीच कशी असा प्रश्न स्वतःलाच विचारला. अखेर दोरखंड आणि इतर साहित्याच्या मदतीने गाईला सुखरूपरित्या खाली उतरविण्यात अग्निशमक दलाला यश आले. पायर्यावरून गाईला खाली उतरवत असताना मात्र जवानांनीही सावध भूमिका घेतली होती. भीतीपोटी जनावर कधीही उडी मारू शकते, याची खबरदारी घेत सावधानतेने गाईला खाली आणले. दरम्यान, चार्याच्या आशेमुळे गाईने दुसरा मजला गाठल्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली आहे.
पुणेकर गाईचाही नाद करायचा नाही, सोशल मीडियावर चर्चा
आम्ही पुणेकर बोलण्यात तर नाही वागण्यातही कोणाला पुढे जाउ देत नाही. पण आमच्या आजूबाजूला असलेली जनावरांचाही कोणी नाद करायचा नाही. चारा मिळला नाही ना, तर तुमच्या इमारतीत येते, असाच संदेश आमच्या पुणेकर गाईने दिला आहे. कसंय मंडळी, आमचा तर नाही, पण आमच्या जनावरांचा पण नाद करू नका, अशा आशयाचे मेसेज आणि गाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.