बनावट कंपनीद्वारे १०४ कामगारांचे ‘पीएफ’ खाते पैसे काढण्यासाठी कामगारांना धमकाविण्याचा मेसेज
Marathinews24.com
पुणे – पैसे कमविण्यासाठी चोरटे कोणत्याही थराला जाउ शकतात, याचाच प्रत्यय कामगारांना आला आहे. कंपनी अस्तित्वात नसताना १०४ कामगारांच्या नावे बनावट भविष्य निर्वाह खाते (प्रोव्हिडंट फंड) उघडून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बनावट खात्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला माहिती नव्हती. संबंधित कामगारांना पीएफ खाते बंद करुन पैसे काढण्यासाठी धमकाविल्याचा मेसेज पाठविण्यात आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्री गणेश एंटरप्रायजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी जयकिसन मोहनदास मनवानी (वय ४९, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गणेश एंटरप्रायजेसचे सीताराम ठकाणसिंग (रा. साठे वस्ती, सणसवाडी) याने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या संकेतस्थळावर श्री गणेश एंटरप्रायजेस या फर्मच्या नोंदणी केली होती. २३ डिसेंबर २०२० रोजी त्याने अर्ज केला होत. त्यानंतर पीएफ कार्यालयाकडून त्याला सांकेतिक क्रमांक देण्यात आला. या कंपनीत १०४ कामगाराच्या नावे ऑनलाइन पद्धतीने ‘पीएफ’ खाते उघडण्यात आले. त्यानंतर श्री गणेश एंटरप्रायजेस नाव असलेल्या वेगवेगळ्या कंपनीतील ११ कर्मचार्यांनी ईमेलद्वारे जून २०२४ मध्ये भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार दिली. संबंधित कंपनीत काम केले नसल्याचे त्यांनी कळविले होते. त्यांच्या संमतीशिवाय बनावट ‘पीएफ’ खाते उघडण्यात आल्याच्या तक्रारी केल्या. संबंधित खाते रद्द करण्यासाठी अज्ञाताने मेसेज पाठविला असून, तो पैसे मागत असल्याच्या तक्रारी पीएफ कार्यालयाकडे दाखल झाल्या.
याप्रकरणी चार कर्मचार्यांनी ते वास्तव्यास असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या होत्या. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील क्षेत्रीय आयुक्त श्री गणेश एंटरप्रायजेस या फर्मच्या मालकांचे पडताळणीचे आदेश दिले. त्यानुसार मनवानी, त्यांचे सहकारी डी. एस. तिलवणकर, अधिकारी अमोद देशपांडे हे ३१ जुलै २०२४ रोजी नगर रस्त्यावरील सणसवाडीत असलेल्या साठे वस्तीतील श्री गणेश एंटरप्रायजेस या कंपनीच्या कार्यालयाची पाहणीसाठी गेले. तेव्हा या भागात संबंधित कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. कंपनीचे मालक सीताराम ठकाणसिंग याचा ठावठिकाणा लागला नाही. बनावट कंपनीच्या नावे ठकाणसिंग याने कामगारांच्या नावे बनावट ‘पीएफ’ खाते उघडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर १ ऑगस्ट २०२४ रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील आयुक्तांना अहवाल सादर केला. आठ महिन्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार श्री गणेश एंटरप्रायजेसचा मालक सीताराम ठकाणसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक धीरज कांबळे तपास करत आहेत.
बनावट ‘पीएफ’ खात्याविषयी प्रश्न उपस्थित ?
आरोपी ठकाणसिंगने बनावट ‘पीएफ’ खाते उघडले, तसेच बनावट दुकान परवाना काढल्याचे उघडकीस आले आहे. १०४ कामगारांच्या नावाने बनावट ‘पीएफ’ खाते काढले. या खात्यात कंपनी मालक दरमहा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरत नव्हता, ही बाब भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकार्यांना लक्षात कशी आली नाही. कंपनी अस्तिवात नसताना दुकान परवाना कसा मिळविला. बनावट खाते काढण्याचा नेमका उद्देश काय होता, यादृष्टीने पोलिसांना तपास करावा लागणार आहे.