शिवाजीनगर पोलिसांकडून कसून तपास सुरू
Marathinews24.com
पुणे – पुण्यात पकडलेल्या २८ लाखांच्या बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातून झाल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. परराज्यातील टोळीने देशभरात बनावट नोटा छापून वितरित केल्याचा संशय आहे. टोळीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची पथके परराज्यात रवाना झाली आहेत.
भाडेकरूंची माहिती देण्यास टाळाटाळ, दोन घर मालकांवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पुणे शहर परिसरात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या ५ जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह पाचजणांना अटक केली होती. त्यांच्याकडून २८ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. याप्रकरणी मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय ३५, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गावंड (वय ३४, रा. केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर ( वय ३५, रा. गहुंजे), नरेश भीमाप्पा शेट्टी ( वय ४२,रा. लोहगाव) आणि प्रभू गुगलजेड्डी ( वय ३८, रा. चिंचवड) यांना अटक केली आहे. पाच आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. बनावट निर्मिती, तसेच वितरण करणाऱ्या टोळीत आणखी काही जण सामील झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बनावट नोटांचा पुरवठा परराज्यातून झाल्याचा संशय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बनावट नोटांच्या प्रकरणात आरोपी शेट्टी, गुगुलजेड्डी यांची सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा चौकशीत या टोळीला परराज्यातून बनावट नोटा छापून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परराज्यातील टोळीने बनावट नोटा छापून देशभरता वितरित केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी शेट्टी आणि गुगलजेड्डी हे १ लाख रुपयांत २ लाख रुपयांच्या बनावट नोटा देत होते. शेटी हा लोहगाव परिसरात राहायला आहे. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्याच्या घरातून एकाच बाजूने छपाई केलेल्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. परराज्यातील टोळीने शेट्टीला बनावट नोटांची छपाई करण्यासाठी मदत केली होती. आर्थिक व्यवहार फिसकटल्याने या टोळीतील काही जणांनी शेट्टीला एकाच बाजूने छपाई केलेल्या नोटा छापून दिल्या. व्यवहार फिसकटल्याने ते परराज्यात पसार झाल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यातील बनावट नोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेट्टी आहे. आरोपी गुगलजेड्डी त्याचा मेहुणा आहे. गुगलजेड्डी परराज्यातील टोळीच्या संपर्कात आला होता. परराज्यातून बनावट नोटा आणून शेट्टीने बाजारात वितरित करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी आरोपी मनीषा ठाणेकरला हाताशी धरले होते. परराज्यातील टोळीने बनावट नोटा कशा छापण्याचे तंत्र शिकविण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतल्याचा संशय व्यक्त केला होता. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी आणि पथक तपास करत आहेत.