दुचाकीस्वार सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा धुडगूस, दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ
Marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी ज्येष्ठ महिलांना लक्ष्य केले असून, वेगवेगळ्या घटनेत चोरट्यंनी ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. रविवार पेठ, सदाशिव पेठ परिसरात दागिने हिसकावून नेण्याच्या घटना घडल्या. याबाबत ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला शनिवार पेठेत राहायला आहेत. श्री महावीर जयंतीनिमित्त त्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. गुरुवारी (१० एप्रिल) सकाळी साडेसातच्या सुमारास रविवार पेठेत दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांची सोनसाखळी चोरुन नेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्याचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तपास करत आहे.
सदाशिव पेठेतील राणा प्रताप उद्यानाजवळ गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला शुक्रवार पेठेत राहायला आहेत. त्या दररोज सकाळी राणा प्रताप उद्यान परिसरातफ फिरायला जातात. नेहमीप्रमाणे त्या सकाळी फिरायला जात होत्या. त्यावेळी राणा प्रताप उद्यानाजवळ दुचाकीस्वार चाेरट्यांनी त्यांच्याकडील ७० हजार रुपयांचे दागिने हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे तपास करत आहेत.