युवक, महिला व स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण, कर्ज मार्गदर्शन आणि बाजारपेठेची संधी
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘अमृत’ (AMRUT) आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती, महिला, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांना कचरा व्यवस्थापन क्षेत्रात शाश्वत उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरणीय नियमांमुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या असून, कचरा ही समस्या नसून उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो.
सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद व काच पुनर्वापर (रिसायकलिंग), तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणीसारख्या व्यवसायांद्वारे रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
‘अमृत-सक्षम’ उपक्रमांतर्गत इच्छुकांना व्यवसायाची निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना व अनुदानाचा लाभ, तसेच उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून संकल्पनेपासून प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंत सर्वंकष सहकार्य देणारा आहे.
या उपक्रमासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नसून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे उद्योजक, विविध संस्थांचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक अर्ज करू शकतात. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षणानंतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग उभारणीसाठी अमृतच्या विविध योजनांमधील सहाय्य, वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ तसेच बाजारपेठेतील मोठ्या खरेदीदार आणि इतर उद्योजकांशी नेटवर्किंगची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इच्छुकांनी https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर किंवा www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’ची टीम पात्र उमेदवारांशी संपर्क साधून जिल्हानिहाय कार्यशाळेची माहिती देणार आहे.
या उपक्रमाविषयी प्राथमिक माहिती देण्यासाठी दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUT च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट (लाईव्ह) सत्र आयोजित करण्यात आले असून इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ७७५७०९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
“अमृत-सक्षम… सक्षम उद्योजक… स्वावलंबी महाराष्ट्र… शाश्वत भविष्य” या संकल्पनेतून हरित उद्योग क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, “मंदीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा… आजच या हरित क्रांतीचा भाग व्हा,” असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.
























