उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार प्रदान
marathinews24.com
पुणे – पिंपरी-चिंचवड परिसरात लहान उद्योगांच्या माध्यमातून अनेक कामगारांना रोजगार प्राप्त होत आहेत. या उद्योगांमध्ये सातारा जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. या कामगारांच्या समस्या आणि लहान उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.।पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पंडीत, ॲडमार्क मल्टीवेंचर कंपनीचे संचालक गणेश दरेकर, पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय सोनावले, संस्थापक अरुण कांबळे उपस्थित होते.
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रम महर्षी’ पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. उपमुख्यमंत्री शिंदे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. सातारा जिल्ह्यात शिंदे यांचे कार्य खूप मोठे आहे. जिल्ह्यात आलेल्या आपत्ती काळात पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. पुरात बेघर झालेल्या ५३४ कुटुंबांना त्यांनी हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. यातील काही घरांचे बांधकाम झाले असून उर्वरित घरे आगामी सहा सात महिन्यात पूर्ण होतील. शिंदे यांनी त्यांच्या दरे गावात अनेक लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. गोरगरीब लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, असेही देसाई म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना देण्यात आलेला ‘श्रम महर्षी’ पुरस्कार त्यांच्यावतीने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला. तसेच यावेळी यशवंत भोसले यांना ‘श्रम योगी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पवना समाचारच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविकात विजय सोनावले यांनी पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाला या परिसरातील उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.