Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

भूसंपादनाची ६० ते ७० टक्के प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

marathinews24.com

पुणे हिंजवडी, मान व मारुंजी भागातील रस्ते विकास, वाहतूक कोंडी, भूसंपादन आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. रस्ते विकासासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’; समाजकल्याण विभागाचा सेवाभावी उपक्रम – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला आमदार शंकर मांडेकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सहा प्रमुख रस्त्यांचा विकास

हिंजवडी आयटी परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहा प्रमुख रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. या रस्त्यांसाठी भूसंपादन, रस्त्याची आखणी आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकरी व जमीनमालकांना त्याचा योग्य आणि जास्तीत जास्त लाभ मिळेल, याबाबत प्रशासनामार्फत आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित शेतकरी व जमीनमालकांकडून सुमारे ६० ते ७० टक्के जमिनीची संमती तसेच आगाऊ ताबा उपलब्ध झाल्यानंतर निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ते विकासाच्या कामांना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
भूसंपादनाची ६० ते ७० टक्के प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष रस्ते कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे

मान, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील शेतकरी व जमीनमालकांना भूसंपादन, हस्तांतरणीय विकास हक्काचे धोरण, दोन किलोमीटरच्या परिसरातील निवासी वापराचे नियम तसेच जमीन देणाऱ्यांना मिळणाऱ्या लाभांची माहिती देण्यासाठी गावनिहाय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे निर्देश देण्यात आले.

अतिरिक्त रस्त्यांची पाहणी

स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार सहा प्रमुख रस्त्यांव्यतिरिक्त आणखी दोन पर्यायी रस्त्यांची शक्यता तपासण्यात येणार आहे. विप्रो चौक, पुनवळे-मारुंजी जोडरस्ता तसेच कालव्यालगतच्या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. कालव्यालगत किंवा सिंचन विभागाच्या ताब्यातील जमिनींचा रस्ते विकासासाठी वापर करण्यासंदर्भातील प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत तयार करून संबंधित कालवा मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आवश्यक परवानगी मिळवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

सांडपाणी नदीत जाणार नाही याची दक्षता

हिंजवडी परिसरातील नदी प्रदूषण आणि सांडपाणी व्यवस्थापनाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. बांधकाम व्यावसायिक आणि आयटी
कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत काही प्रमुख गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औद्योगिक व निवासी प्रकल्पांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना

भूमकर चौक, रावेतसह प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, खड्डे बुजविणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करण्यावर भर देण्यात आला. वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हलक्या वाहनांसाठी आवश्यक रस्ते खुले करणे तसेच डांबरीकरणाची कामे तातडीने हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले.

पाणीपुरवठा व पायाभूत सुविधांचा आढावा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यातील पाणीपुरवठा तसेच रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या मोबदल्याच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने प्रलंबित प्रश्न निकाली काढून पायाभूत सुविधांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. संबंधित कामांना गती देण्यात येत असून, रस्ते विकास, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच हिंजवडी, मान व मारुंजी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×