दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा- उपमुख्यमंत्री अजित पवार
marathinews24.com
पुणे – शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, निविष्ठा खर्च कमी करणे तसेच उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणारा ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ या पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, कृषी संचालक रफीक नायकवडी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.
अमिताभ गुप्ता यांच्या कामाची आजही वाहवा, सिविल सर्विस डे निमित्ताने विशेष लेख – सविस्तर लेख इथे वाचा
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, केवळ लक्ष्यांक आणि आकड्यांवर भर न देता आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची बलस्थाने तसेच उणिवा या ओळखून त्यावर वैज्ञानिक आणि व्यवहारिक उपाययोजनांचा ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जग पुढे जात असताना सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे राज्यानेही दोन वर्षासाठी 500 कोटींची तरतूद केली असून पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधीबाबत विचार करण्यात येईल.
राज्यात धरणे बांधण्याजोग्या जागा जवळपास संपल्या असून लोकसंख्यावाढीमुळे महानगरांना पिण्यासाठी अधिकाधिक पाणी द्यावे लागत आहे. आता मुळशीसारख्या जलविद्युत प्रकल्पांतून वीजनिर्मिती करण्याऐवजी सौरउर्जा प्रकल्प, सहवीज प्रकल्प, आण्विक वीज निर्मिती प्रकल्प आदी पर्याय उपलब्ध आहेत. तर जलविद्युत प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी दिले पाहिजे. जेणेकरुन अन्य प्रकल्पांचे पाणी शेतीसाठी देता येईल, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.
पुण्यात राबविण्यात येणारा ॲग्री हॅकॅथॉन उपक्रम टप्प्या- टप्प्याने राज्यभरात राबविण्यात येईल. या उपक्रमात राज्य शासन, कृषी विभाग, महाविद्यालय, विविध औद्योगिक संघटना, कंपन्या,मायक्रोसॉफ्टसारखी संस्था, पाणी फाऊंडेशन आदी सहभागी असून त्याचा कृषी क्षेत्रासाठी मोठा उपयोग होणार आहे. कृषीच्या क्षेत्रात नावाजलेले, योगदान देणाऱ्या सर्व घटकांची मदत राज्यातल्या कृषी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
करोना संकटाच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानेच तारले आहे. शेतीसमोर बदलते हवामान, दुष्काळ, घटत चाललेले शेतीचे आकारमान या समस्या आहेत. त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आवश्यक आहे. बदलत्या शेतील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कधीही खचू नये, नाउमेद होऊ नये, त्यांना राज्य शासन कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त आत्मविश्वास ढळू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, राज्यात नवीन कृषी धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील शेतकरी, प्रगतीशील शेतकरी, महिला शेतकरी आदींशी संवाद साधण्यात येत आहे. शेतकरी आणि शेती क्षेत्राचा चांगले दिवस आणल्याशिवाय कृषी विभाग स्वस्थ बसणार नाही. यासाठी राज्यातील यशस्वी, चांगले प्रयोग केलेले शेतकरी यांचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पाहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
निर्यातक्षम कृषी उत्पादनात वाढ, मूल्यवर्धन, प्रक्रिया आदी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून राज्याची सध्याची कृषी निर्यात 1 हजार 500 कोटी रूपयांवरून 50 हजार कोटींवर कशी जाईल, शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कृषीमालाचे उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, केलेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण करणे महत्त्वाचे असून अशी 100 टक्के खात्री झाल्यावर तरुण शेतकरी शेतीकडे वळतील, असा विश्वासही कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रधान सचिव रस्तोगी म्हणाले, कृषीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेणे, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांची माहिती व ते अन्य शेतकऱ्यांकडे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. विभागाने जैविक खते तयार करण्याच्या दृष्टीने एक मोठा उपक्रम हाती घेतला असून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. सत्यापित (ट्रुथफुल) बियाण्यांच्या अनुषंगानेही विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आपल्या कामकाजाची तसेच अन्य माहिती भरण्यासाठी एक ॲप तयार केले असून त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा आराखडा पुढील पाच वर्षात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ. निर्यातसाखळी तयार करणे यातून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या 1 ते 3 जून दरम्यान जिल्ह्यात ॲग्री हॅकॅथॉन राबविण्यात येणार असून त्यातून पुढे येणारे तंत्रज्ञान 1 जूनपासून प्रत्यक्ष शेतीमध्ये राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग संघटना, कंपन्या, महाराष्ट्र बँक जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी प्रगतीशील शेतकरी तसेच उत्कृष्ट काम केलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘कृषी संवाद- पुणे जिल्हा’ व्हॉट्स ॲप चॅनेलच्या क्यू आर कोडचे लोकार्पण करण्यात आले. तसेच महसूल विभागाच्या सेवा, दाखले घरपोच मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या सेवादूत ॲप व प्रणालीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ. महानंद माने, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन राजे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक गटांचे शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संशोधक, तंत्रज्ञ, कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.