कोंढव्यातील भोलेनाथ चौकात भीषण अपघात, चालक अटकेत
marathinews24.com
पुणे – भरधाव इनोव्हा चालकाने दिलेल्या धडकेत १३ वर्षीय मुलगा ठार झाला आहे. ही घटना रविवारी दि. १८ संध्याकाळी सहाच्या सुमारास कोंढवा बुद्रुक गावठाणमधील भोलेनाथ चौकात घडली आहे. इनोव्हा कारने (क्र. MH 31 CA 5888) दिलेल्या जोरदार धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय 13) अल्पवयीन मुलाचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. इनोव्हाचा चालक जैद नसीर शेख (वय 23, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे.
बेशिस्त ट्रक चालकामुळे क्लासला निघालेल्या ११ वर्षीय मुलाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पादचारी निवृत्ती हा रविवारी संध्याकाळी सहा वाजता रस्त्याने जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने इनोव्हा चालवित आलेल्या जैदने त्याला धडक दिली. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत निवृत्तीला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे. अपघातप्रकरणी इनोव्हा कारचा चालक जैद नसीर शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने मद्यप्राशन केले होते का, याची तपासणी ससून रुग्णालयात पाठवून केली. त्याचप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी ब्रेथ अनालायझरद्वारे तपासणी केली असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, घटनास्थळी पंचनामा केला असून, तपास पथक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहे.
याप्रकरणी आरोपी चालक जैद नसीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून, त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.