‘ओव्हर ऑल टॉपर’ या विशेष गौरवाने सलग दुसऱ्यांदा सन्मानित; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सन्मान
marathinews24.com
पुणे – संसदेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच राज्यसभेत एकूण कामगिरीमध्ये ‘ओव्हर ऑल टॉपर’ म्हणूनही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने लोकसभा आणि राज्यसभेतील उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी खासदारांना ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांचे यंदा १६ वे वर्ष होते.
गणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्ती – सविस्तर बातमी
माजी सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री सुकांत मजुमदार, पुरस्कार ज्युरी समितीचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण झाले. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत सक्रिय सहभाग नोंदवत सर्वच आघाड्यांवर उल्लेखनीय व लोक-देशहिताचे मुद्दे मांडत प्रभावी कामगिरी केली. सर्वोत्तम कामगिरीसाठी डॉ. कुलकर्णी यांना सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पुण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. त्यांच्यासमवेत महाराष्ट्रातून भाजपचे हेमंत सावरा, स्मिता वाघ, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे व नरेश मस्के यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. कुलकर्णी यांनी रेल्वे, महिला सुरक्षा, आरोग्य, ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक न्याय, कॉर्पोरेट जिहादच्या संबंधित विषयांवर संसदेमध्ये सातत्याने मुद्देसूद भाष्य केले आहे. विशेष सत्रात, झिरो अवर, प्रश्नोत्तरे व विविध विषयांवरील चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी महिला सुरक्षा, विमा सुरक्षा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, आधार प्रमाणीकरण, आरटीई प्रवेश प्रक्रिया, शेतजमिनी याबाबत लक्षवेधी मांडल्या.
या पुरस्काराबाबत बोलताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “संसदेतील सक्रिय सहभाग, जनहिताचे प्रश्न आणि संसदीय कामकाजातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार दिल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. हा पुरस्कार पक्षनेतृत्वाचा विश्वास, जनतेचे आशीर्वाद आणि सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याची पावती आहे. त्याचबरोबर हा सन्मान समाधानासोबतच संसदीय जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. संसदेत जनहिताचे प्रश्न, धोरणात्मक विषय तसेच पर्यावरण, विज्ञान, विकास आणि राष्ट्रहिताशी निगडित मुद्दे सातत्याने मांडण्याच्या प्रयत्नांची ही महत्त्वपूर्ण पावती आहे.”
राज्यसभेच्या माध्यमातून देशसेवेची संधी देऊन सातत्याने मार्गदर्शन आणि विश्वास देणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत संसद हे केवळ लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ नाही, तर जनतेच्या अपेक्षा आणि राष्ट्राच्या विकासदृष्टीला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. या व्यासपीठाचा अधिकाधिक प्रभावी आणि विधायक उपयोग करून समाजहित, पर्यावरणसंवर्धन आणि राष्ट्रविकासासाठी कार्य करण्याचा माझा संकल्प अधिक दृढ झाला असल्याचे त्या म्हणाल्या.
























