परराज्यातील सायबर चोरट्यांचा पर्दाफाश; वाघोली पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – क्रेडिट कार्ड हॅक करुन फ्लिप कार्डवरुन मोबाईल खरेदी करणार्या परराज्यातील सायबर टोळीचा पुणे पोलिसांच्या वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून १२ लाख रूपयांचे ४५ मोबाइल जप्त केले आहेत. अस्लम मोफिद खान (वय २२ रा. भिवुर ता. चैनपुर जि.कैमुर बिहार सध्या वाघोली पुणे ) आदिब रिझवान खान (वय २१ रा. नौसारी विरावल रोड, सुरत गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत – सविस्तर बातमी
तक्रारदार तरूणाचे क्रेडीट कार्ड हॅक करून सायबर चोरट्यांनी १ लाख ७ हजारांचे मोबाइल खरेदी केल्याची तक्रार वाघोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. संबंधित मोबाईल फोनची डिलीव्हरी वाघोली केसनंद रोड, प्रिन्स मेडिकल, वाघोलीत झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर तपास पथकाने फ्लिफकार्ड ऑफिसला जाउन मोबाईलची डिलीव्हरी रिसिव्ह करणार्याचे फोटो पोलिसांनी मिळवले. फोटोच्या आधारे वाघोली, केसनंद, बकोरी, खराडी, चंदननगर भागात त्यांचा शोध घेतला. त्यावेळी दोघेही काळुबाईनगरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. वाघोली पोलिसांनी अस्लम मोफिद खान आणि आदिब रिझवान खान यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी आदिबचे साथीदार हे क्रेडिड कार्ड हॅक करुन फ्लिफ कार्डवरुन मोबाईल खरेदी करीत होते. आरोपी आदिब हा सुरत येथुन विमानाने येउन साथीदार अस्लम खानच्या मदतीने मोबाइल घेउन सुरतमध्ये विक्री करीत होता . ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, रमेश साबळे, किरण अब्दागीरे, विष्णु सरवदे, सतिश बिरादार, वृंदाविनी चव्हाण यांनी केली.























