राजगड, शिरूर तालुक्यात कार्यरत होत्या टोळ्या
marathinews24.com
पुणे – नागरिकांमध्ये दहशत, दादागिरीसह विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे करणार्या जिल्ह्यातील राजगड (वेल्हे), तसेच शिरूर तालुक्यात दहशत माजविणार्या दोन गुंड टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिले आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार टोळ्याविरूद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाण – सविस्तर बातमी
राजगड पोलीस ठाण्यात लक्ष्मण इंगुळकर आणि साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, लूट, मारहाण, धमकी, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर शिरूर परिसरातील योगेश केशव मचाले आणि साथीदारांविरुद्ध खंडणी, दहशत माजविणे, प्राणघातक हल्ला करणे, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणणे, मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर स्वरुपाचे २७ गुन्हे दाखल आहेत. इंगुळकर आणि मचाले टोळीचे म्होरके, साथीदारांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते. दोन्ही टोळ्यांविरुद्ध मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, राजगड, वेल्हे पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी तयार केला होता. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला.
गुंड इंगुळकर आणि मचाले टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश रंजनकुमार शर्मा यांनी दिले. पुणे जिल्ह्यात दहशत माजविणार्या गुंड टोळ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला आहे. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महेश बनकर, रामदास बाबर, तुषार पंधारे, जर्नादन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, परसराम सांगळे, नितीन सुद्रीक, राहूल भवर, शरद वारे, नीरज पिसाळ, सचिन भोई यांनी केली आहे.






















