बिल्डर विठ्ठल पोळेकर खूनातील टोळीवर मोक्का पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका
marathinews24
मराठी न्यूज२४ पुणे : बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून करणार्या सराईत टोळीप्रमखासह त्याच्या साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने टोळीला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर टोळीविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली आहे.
टोळीप्रमुख योगेश उर्फ बाबू किसन भामे वय ३२, रा. डोणजे, हवेली रोहित किसन भामे (वय २२ रा. डोणजे ता. हवेली) शुभम पोपट सोनवणे (वय २४ , रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मिलींद देवीदास थोरात (वय २४ रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर) रामदास दामोदर पोळेकर (वय ३२ रा. पोळेकरवाडी, डोणजे ) मोक्का कारवाई केलेल्या टोळीचे नाव आहे. विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७० रा. पोळेकर वाडी, सिंहगड रोड, डोणजे) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह हवेली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तब्बल २ कोटींची खंडणी, अलिशान मोटारीच्या मागणीतून खून केल्याचे उघडकीस आले होते.
धनकवडीतील आगीच्या प्रकरणात हॉटेल मालकाला पोलिसांचा तपास सुरू – सविस्तर बातमी
डोणजे परिसरातील विठ्ठल पोळेकर हे १४ नोव्हेंबरला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यानंतर टोळक्याने त्यांचे अपहरण करून खून केल्याचे उघडकीस आले. पोळेकर यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता. आरोपी योगेश ऊर्फ बाबुने त्यांच्याकडे खंडणी म्हणून जॅग्वार कंपनीची मोटार मागितली होती. त्याची पुर्तता न केल्यामुळे टोळीने पोळेकरचा खुन केला होता. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टोळीला बेड्या ठोकल्या. टोळीविरूद्ध मोक्काचा प्रस्ताव हवेलीचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाला पाठविला होता. अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, एपीआय कुलदीप संकपाळ, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय सागर पवार, हनुमंत पासलकर, महेश बनकर, रामदास बाबर, अतुल डेरे, दिपक साबळे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, तुषार भोईटे, मंगेश भगत, अमोल शेडगे, काशिनाथ राजापुरे, दगडू विरकर यांच्या पथकाने टोळीला पकडले होते.
टोळीप्रमुख आरोपी सराईत, ९ गुन्हे दाखल
आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याच्यावर शरीराविरूद्धचे ९ गुन्हे दाखल असून आर्थिक लाभासाठी त्याने गुन्हे केले आहेत. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी शुभम सोनवणे याच्यावर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे दोन गुन्हे दाखल आहेत. संबंधित गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी करीत आहेत.
बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून करणार्या टोळीला अटक केली होती. याप्रकरणी टोळीविरूद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार टोळीविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण