९ वर्षांनंतर प्रकार उघडकीस; उपनिरीक्षक अटकेत
marathinews24.com
पुणे – भावाला पोलीस करण्यासाठी उपनिरीक्षक चक्क मुन्नाभाई एमबीबीएस बनल्याचे उघडकीस आले आहे. भावाऐवजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्यालयातील पोलीस उपनिरीक्षकाने लेखी परीक्षा दिली. ९ वर्षांनंतर पोलीस उपनिरीक्षकाने केलेली फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालायने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हलाल सर्टिफिकेशन नियमावलीत बदल करावा – सविस्तर बातमी
सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तोतयेगिरी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे, परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर २४ एप्रिल २०१६ रोजी पोलीस भरती प्रक्रियेंतर्गत लेखी परीक्षा पार पडली होती. भरती प्रक्रियेत गजानन गुसिंगे उमेदवार हाेता. त्याने ५ आणि ६ एप्रिल २०१६ रोजी मैदानी चाचणी दिली होती. त्यानंतर २४ एप्रिलला झालेल्या लेखी परीक्षेत त्याने ‘डमी’ परीक्षार्थीला परीक्षा देण्यास सांगितले होते.
गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लेखी परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. लेखी परीक्षा देणारा उमेदवार गजानन गुसिंगे याच्याऐवजी दुसरा एक जण प्रश्नपत्रिका सोडवत असल्याचे चित्रीकरणात दिसून आले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. गजाननच्या ऐवजी परीक्षा देणारी दुसरी व्यक्ती त्याचा सख्खा भाऊ असल्याची माहिती तपासात मिळाली.
गजाननचा भाऊ सुप्पडसिंग हा पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रूजू झाल्याची माहिती मिळाली. सुप्पडसिंग हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्तीस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुप्पडसिंगला राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
‘आरोपी सुप्पडसिंग याचा भाऊ गजानन याचा शाेध घ्यायचा आहे. दोघांनी भरती प्रक्रियेतील बनावट कागदपत्रे, ओळखपत्र कोठून तयार केली, यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपीला पोलीस कोठडी द्यावी,’ अशी विनंती सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी न्यायालयात केली. आराेपी पोलीस उपनिरीक्षक सुप्पडसिंग याच्याकडून ॲड. चेतन भुतडा यांनी बाजू मांडली. दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.




















