घरगुती वादातून खून करणाऱ्या पतीला बीट मार्शलांनी पकडले
marathinews24.com
पुणे – घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून अॅक्टिवा दुचाकीवर नेत असतानाच आरोपी पतीला बीट मार्शल पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली देत मृतदेह घाटात फेकून देण्यासाठी जात असल्याची कबुली त्याने दिली आहे. बीट मार्शलांच्या चाणाक्षपणामुळे दुचाकीस्वार आरोपीला अटक करून खूनाची उकल केली आहे. ही घटना ६ मे ला रात्री दीडच्या सुमारास भुमकर ब्रिज ते स्वामी नारायण मंदीर जाण्यार्या सर्विस रस्त्यावर उघडकीस आली आहे.
दारू आणून न दिल्याने तरुणाचा केला खून, काशेवाडी परिसरातील घटना – सविस्तर बातमी
बबीता राकेशकुमार निशाद (वय २६ रा. धायरी ) असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. राकेशकुमार रामनाईक निशाद (वय २८ रा. साईधाम सोसायटी, लायगुडेमळा, धायरी पुणे, मुळ रा. चकोरागाव, ता. फत्तेपूर बसखारी, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस अमलदार ज्ञानेश्वर आखाडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीनच्या कॉप्स २४ अंतर्गत सिंहगडरोड पोलीस ठाण्यात पोलीस अमलदार ज्ञानेश्वर आखाडे सी.आर मोबाईलवर कर्तव्यास आहेत. पोलीस ठाणे हद्दीतील निर्जन स्थळांना भेटी देणे, गर्दीच्या ठिकाणी भेटी देणे, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. ५ मे ला आखाडे हे ड्युटीलवर होते. त्यावेळेस ते चालक निल सुरज लोंढे यांच्यासह सिंहगडरोड हददीत पेट्रोलिंग करीत होते. ६ मे ला रात्री दीडच्या सुमारास त्यांनी स्वामी नारायण मंदीर नर्हेत भेट दिली. त्यानंतर सर्विस रोडवर पेट्रोलिंग करीत असताना एकजण दुचाकीवरून पोत्यात काहीतरी घेउन चालला असल्याचे त्यांना दिसून आले.
अॅक्टीव्हा गाडीचालक ( एमएच १२ / ईआर / ६५५) हा पोत्यामध्ये काहीतरी संशयितरित्या घेऊन जात असल्यामुळे बीट मार्शलांनी त्याचा पाठलाग केला. त्याने साईबा चहाच्या टपरीसमोर रस्त्यावर गाडी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीट मार्शलांनी त्याचा पाठलाग करून राकेशकुमार निशाद याला पकडले. त्याच्या गाडीवर असलेले पोते व बेडशिटमध्ये बांधलेल्या गाठोड्यामध्ये काय आहे, याची विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोत्यातून मानवी पाय बाहेर आल्याचे दिसल्याने अमलदारांनी त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने ‘ ती माझी बायको बबीता असून, घरगुती कारणावरून गळा दाबून खून केला आहे. पत्नीची बॉडी बोगद्याजवळील डोंगरात टाकण्यासाठी चाललो असल्याची कबुली दिली. याप्रकरणी मार्शलांनी वरिष्ठ अधिकार्यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रात्रपाळीला असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केला.