Breking News
तडीपार असताना कोयत्यासह फिरणाऱ्या सराईताला अटक…३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे उद्दिष्ट – मंत्री जयकुमार गोरेदेशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससामूहिक बलात्कारातील तिसऱ्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्यापुणे : खुनाच्या प्रयत्नात ३ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला बेड्या…पिस्तुल बाळगणाऱ्याला अटक, खंडणी विरोधी पथक दोनची कामगिरीकबुरतराला मारत असताना तृतीयपंथीयाकडून मिस फायर, कोंढाव्यातील घटना…पाचव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुर ठारदहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वनराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रयत्न करावे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

गुढीपाडवा अन प्राचीन महत्त्व

गुढी उभारण्याचा आणि वस्तु खरेदीचा मुहूर्त जाणून घेऊया 

पुणे- मांगल्याचे प्रतीक असलेला गुढीपाडव्या निमित्ताने घरोघरी गुढ्या उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यंदाच्या वर्षी शके १९४७ विश्वावसु नावाचे संवत्सर आहे. हा उत्सव घरोघरी करावयाचा असल्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहत असल्यास तिथे गुढीपूजन व पंचांगावर असलेल्या गणपतीचे पूजन अवश्य करावे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टीला चालना दिली, तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस समजला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे नवीन उद्योग, व्‍यवसायाचा शुभारंभ करण्‍यास हा सण उत्‍तम मानला जातो. गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन आहे. `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

 गुढीपाडवा अन प्राचीन महत्त्व
गुढीपाडवा अन प्राचीन महत्त्व

गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ !

साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात. तसेच शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो. याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते. सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात.

सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -‘ब्रह्मध्वजाय नम:|’ असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते.गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते.

कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील ‘मी कोणीतरी फार मोठा आहे,’ हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते. गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो. म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा ! सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे. व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.गुडीपाडवा हा सण शतकानुशतके आधी पासून सुरु आहे.आपली कालगणना हजारो वर्षे जुनी आहे. ग्रहांवर आधारित असलेली ही कालगणना पंचांगाच्‍या माध्‍यमातून आपल्‍याला कळते, म्‍हणून संवत्‍सरारंभाच्‍या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे. सकाळी लवकर गुढी उभी करून सूर्यास्‍ताच्‍या दरम्‍यान नमस्‍कार करून ती पुन्‍हा उतरवून ठेवावी.

महत्त्व –

– इसवी सन- १ जानेवारीपासून

– आर्थिक वर्ष- १ एप्रिलपासून

– हिंदु वर्ष – चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून

– व्यापारी वर्ष -कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून

– शैक्षणिक वर्ष – जूनपासून

– सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ आहेत.

यामध्ये सर्वत्र १२ महिन्यांचेच वर्ष आहे. वर्ष १२ महिन्यांचे असावे’, असे प्रथम कोणी सांगितले, जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद’ आहे. वेद हे अतिप्राचीन वाड;मय आहे, याबद्दल दुमत नाही. `द्वादशमासै: संवत्सर: ।’ असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का, याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कारणे आहेत.

नैसर्गिक – ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय) त्यानंतर वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक महत्त्व-

या दिवशी काय झाले होते

– रामाने वालीचा वध केला.

– राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले.

– शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.

– या दिवसापासूनच `शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला. शक, हुण आदी अनेक परकीय आक्रमकांना त्याने स्थानीय फौज उभारून पराभूत करीत देशाबाहेर पिटाळून लावले.

आध्यात्मिक महत्त्व-

सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

श्री संत चोखामेळा आपल्या एका अभंगात याचे सार सांगताना म्हणतात

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाहीं चित्ता । ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुद्ध होउनी जावें । दवंडी पिटी भावें चोखामेळा ॥५॥

सर्व प्रकारच्या खरेदीसाठी मुहूर्त-

दुपारी १२:३० ते संध्याकाळी ४:५५ पर्यंत उत्तम काळ आहे.

लेखक- मंदार लक्ष्मण संत
रा. पुणे( हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक )

महत्त्वाचे – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व चैत्र महिना वास्तु शांति अथवा गृहप्रवेश, भुमी पुजन असे कोणतेही कर्म करू नये.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top