उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
marathinews24.com
पुणे – पुणे पोलीस दलात लवकरच एक हजार पोलीस कर्मचारी – पोलीस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, लवकरच त्यापैकी किमान एक हजार उमेदवारांना पुणे पोलीस दलात सहभागी करून घेतले जाईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
विठुरायाच्या कृपेने संकल्प सिद्धी – डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन अंकित विठ्ठलवाडी येथील ‘आनंदनगर पोलीस चौकी’च्या इमारतीचे लोकार्पण करताना पाटील बोलत होते. राज्यमंत्री मिसाळ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, दीपक मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वीरेंद्र केळकर, कीर्ती कुंजीर, मिथुन होवाळ यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाहनांची संख्या ही वाढत आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत. शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.”
मिसाळ म्हणाल्या, “राजाराम पूल परिसरात पुणे शहर पोलिसांची हद्द संपत होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील हवेली पोलीस स्टेशनमध्ये जावे लागायचे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हद्द वाढवून घेतली आणि आरक्षित असलेल्या दोन जमिनीवर पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले. आज पोलीस चौकीचे लोकार्पण झाले असून दोन महिन्यांमध्ये पोलीस स्टेशनचे कामही पूर्ण होईल.”
आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “गृह विभागाने पुण्यासाठी सात नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी दिली आहे. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही यंत्रणेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलीस दलात मनुष्यबळ ही वाढवले जात आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या क्षमता वाढत असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू.”
मिसाळ म्हणाल्या, “पोलीस चौकीची ही जागा प्रशस्त आणि मध्यवर्ती ठिकाणी आहे. महिला आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्राम कक्ष निर्माण केले आहेत. सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन येथील सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी या ठिकाणी सायबर कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या इमारतीत स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन व्हावे यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहोत.”