ट्रक चालकासह साथीदार अटकेत
marathinews24.com
पुणे – शहरातील मार्केटयार्ड भागात पोलीस हवालदाराला ट्रकचालक आणि साथीदारांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकासह तिघांना अटक करण्यात आली. सुमीत सुभाष सरकटे (वय ३४, रा. खराडी, नगर रस्ता), अक्षय नानासाहेब शिंदे (वय ३०, रा. तळवडे, ता. संगमनेर, अहिल्यानगर), मनजीत सुभाष कांबळे (वय २८, रा. घोरपडी गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार महेश सुभाष साळुंखे (वय ३९, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
स्वारगेट, स्टेशन परिसरात मोबाइल हिसकावले – सविस्तर बातमी
हवालदार साळुंखे हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. ते गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास कामावरून बिबवेवाडीतील घरी निघाले होते. मार्केट यार्डातील वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक दरम्यान ट्रक भरधाव वेगात निघाला होता. गंभीर स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता होती. दुचाकीस्वार पोलीस हवालदार साळुंंखे यांनी ट्रकचालकाला मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक नऊजवळ अडविले. त्यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी ट्रकचालकास मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हवालदार साळुंखे यांनी जमावाला शांत केले.
त्यानंतर ट्रकचालकाने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. आरोपी अक्षय शिंदे आणि साथीदारांनी हवालदार साळुंखे यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात हातातील कडे मारले. त्यानंतर आरोपी पसार झाले. साळुंखे यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाल दिली. साळुंखे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, मार्केट यार्ड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.





















