गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच लाखांची मागणी
marathinews24.com
पुणे – गुटखा विक्री प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यानेच तब्बल पावणे दोन लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. किराणा दुकानदाराला गुन्हा नोंद करण्याची धमकी देत त्याला ठाण्यात बोलवून त्रास दिल्याचेही उघड झाले आहे. याप्रकारानंतर वरिष्टांनी याची गंभीर दखल घेत पोलिसासह दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.
पुण्यात काका-पुतण्याने केली सव्वा दोन कोटींच्या दागिन्यांची चोरी – सविस्तर बातमी
पोलिस अंमलदार रामकिशन हंबर्डे आणि खासगी व्यक्ती सतीश मोरे (रा. वडकी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यावसायिकाने फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुण्यात तीन दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पोलिस अंमलदार हंबर्डे हा २०१४ मध्ये भरती झाला आहे. त्याची नेमणूक फुरसूंगी पोलिस ठाण्यात होती. तो पोलिस ठाण्याच्या सायबर सेलमध्ये कर्तव्यास होता.
तक्रारदाराचे उरूळी देवाची परिसरातील सह्याद्री चौकात किराणा दुकान आहे. तीन दिवसांपुर्वी (दि. ८ ऑक्टोबर) सकाळी सातच्या सुमारास हंबर्डे आणि खासगी व्यक्ती गेले. त्यांनी पोलिस असल्याचे सांगत दुकानदाराकडे गुटखा विक्रीबाबत विचारणा केली. नंतर दुकानातील अतिरिक्त माल ठेवलेल्या खोलीतून विमल सुगंधी सुपारीच्या दोन गोण्या ताब्यात घेतल्या. गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी ५ लाखांची खंडणी मागितली. व्यावसायिकाला पोलिस ठाण्यातही आणले.
एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतर सेटलमेंट करून व्यावसायिकाकडून १ लाख ६५ हजार रुपयांवर तडजोडीत घेतले. पैसे घेतल्यानंतर गुटखा परत केला. परंतु, पुन्हा व्यावसायिकाला ठाण्यात बोलवून प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. आणखी पैसांसाठी त्रास दिल्याची माहिती आहे. या त्रासानंतर संबंधित व्यावसायिकानेच थेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली. तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली. तेव्हा स्टेशन डायरी किंवा याप्रकाराबाबत ठाणे स्थरावर कोणालाही काही न कळविल्याचे समोर आले. त्यानंतर प्राथमिक चौकशीकरून थेट पोलिस अंमलदारासह दोघांवर खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.























