चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.
येरवड्यात निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यावर अल्पवयीनांकडून हल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी
सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.
किराणा माल दुकानातून रोकड लांबविली
किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.




















