चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – सुरक्षा रक्षकाला बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून चोरट्यांनी भारत संचार निगम लिमिटेडच्या भवानी पेठेतील कार्यालयातून चोरट्यांनी लोखंडी पाईप चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सुरक्षारक्षक शंकर धोडिंबा धोत्रे (वय ६०, रा. व्यंकटेश अपार्टमेंट, नवी पेठ ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोटार चालकाला धमकावून ५ हजार मागणारा पोलीस अटकेत – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील श्री गुरुनानकनगर परिसरात भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) कार्यालय आहे. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास तीन चोरटे कार्यालयाच्या आवारात शिरले. चोरट्यांनी सुरक्षारक्षक धोत्रे यांना पिस्तुलासारख्या दिसणाऱ्या शस्त्राचा धाक दाखविला. ‘आरडाओरडा केल्यास पिस्तुलातून गोळ्या घालून ठार मारु’, अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. त्यानंतर आवारात ठेवलेले लोखंडी पाईप चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे तपास करत आहेत.























