तरुणाला मारहाण प्रकरणातील पाच महिन्यांपासून फरार आरोपीही जेरबंद
marathinews24.com
पुणे – Pune Crime Branch Action : शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या चार आरोपींना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे. धनकवडी येथील तीन हत्ती चौक परिसरात सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ रामकृष्ण कांबळे (वय ३८ वर्ष, रा. गल्ली क्र. ५२, तळजाई वसाहत) बापू रामकृष्ण कांबळे (वय ३८ वर्ष, रा. तळजाई वसाहत) प्रेम सोमनाथ कांबळे (वय १९) साहिल बापू कांबळे (वय २२) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील कॅम्प, कोथरुडमध्ये घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना युनिट दोनच्या पथकातील पोलिस अंमलदार महेश मंडलिक आणि उज्वल मोकाशी यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धनकवडी येथील तीन हत्ती चौकात थांबले आहेत. या माहितीवरून पथकाने खाजगी वाहनाने परिसरात सापळा रचला. संशयितरीत्या थांबलेल्या चार जणांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार शंकर नेवसे, अंमलदार कुंदन शिंदे यांच्या पथकाने केली.
पाच महिन्यांपासून गुंगारा देणारा जेरबंद
मित्रासोबत दुचाकीवरून जाताना वाद घालून तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फरशीच्या तुकड्याने हातावर वार करून जखमी करत धमकी दिल्याच्या गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकने जेरबंद केले. साहिल इरफान दावतखानी (वय २२, रा. गुरुवार पेठ, धनगरआळी परिसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ३ मे २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भवानी पेठेतील भारत टॉकीजजवळ घडली होती.
तक्रारदार आणि त्याचा मित्र दुचाकीवरून कॅम्पच्या दिशेने जात असताना चार अनोळखी इसमांनी संगनमत करून त्यांच्याशी वाद घातला. नंतर शिवीगाळ करत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फरशीच्या तुकड्याने तक्रारदाराच्या डाव्या हाताच्या तळहातावर, तसेच त्याच्या मित्राच्या डाव्या हातावर आणि पाठीवर वार करून जखमी करण्यात आले. याशिवाय धमकीही देण्यात आली होती. वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक धीरज राऊत तसेच पोलिस कर्मचारी प्रमोद जगताप व त्यांच्या पथकाने केली आहे.























