दारूगोळा कारखान्यातील कामगारच निघाला चोर २२ काडतुसे जप्त, काडतुसे चोरणारा गजाआड
marathinews24
मराठीन्यूज २४ पुणे– लष्करासाठी दारुगोळा बनविणार्या कारखान्यात काम करणार्यानेच चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. कारखान्यातून काडतुसे चोरून नेणार्या कामगाराला गुप्तचर यंत्रणेने पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. त्याच्याकडून २२ काडतुसे जप्त केली आहेत. गणेश वसंतराव बोरुडे (वय ३९, रा. कल्पतरु सोसायटी, खराडी ररस्ता चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत दारुगोळा कारखान्यातील कनिष्ठ अभियंता जयेंद्र कस्तुरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील दारुगोळा कारखान्यातील काडतुसे कामगाराकडून चोरली जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्यांनी दारुगोळा कारखान्यातील अधिकार्यांना दिली होती. त्यानुसार खडकी पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्यांनी वेशांतर करुन दारूगोळा कारखान्यातील प्रवेशद्वार क्रमांक १२ जवळ सापळा रचला. शुक्रवारी ( दि.२८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी कामगार गणेश बोरूडे प्रवेशव्दारातून बाहेर पडला. त्यावेळी पोलीस आणि लष्करी गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीच्या fिडकीची तपासणी केली असता २२ काडतुसे मिळून आली.
काडतुसांची कोणाला विक्री केली का? यादृष्टीने तपास
आरोपी गणेशची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी गणेशने यापूर्वी किती वेळा काडतुसे चोरून नेली, यादृष्टीने तपास केला जात आहे. त्याने चोरलेल्या काडतुसांची कोणाला विक्री केली का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यावर भर दिला आहे. त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलम, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चौगले तपास करत आहेत.