घायवळ टोळीतील गुंडाकडून बनावट कागदपत्रांद्वारे शस्त्र परवाना
marathinews24.com
पुणे – शहरातील कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदेने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने १५ परवान्यांची प्रक्रिया पार पडल्याची माहिती तपासात मिळाली आहे. संबंधित दलालाने सादर केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
घायवळ टोळीतील गुंडांनी १७ सप्टेंबरला कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात दहशत माजविली. गुंडांनी पिस्तुलातून एकावर पिस्तुलातून गोळीबार केला, तसेच एका तरुणावर कोयत्याने वार केले. याप्रकरणात घायवळ टोळीलील सराइत अजय सरोदे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. याप्रकरणात घायवळ याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. सरोदे याच्या घराची झडती पोलिसांनी नुकतीच घेतली. तेव्हा त्याच्या घरात तब्बल ४०० काडतुसे सापडली. तपासात सरोदे याच्याकडे पिस्तूल परवाना असल्याची माहिती मिळाली होती. शस्त्र परवाना मंजुरीसाठी त्याने दलालाची मदत घेतली होती. सराेदे याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल होते. ही माहिती दडवून त्याने येरवड्यातील पत्ता शस्त्र परवाना मिळवण्यासाठी दिला होता. बनावट रहिवासी पुरावा, तसेच प्रतिज्ञापत्र त्याने सादर केले होते.
शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी त्याने नीलेश फाटक याची मदत घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी दलाल फाटक, तसेच सरोदे याच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात फाटक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोठडीत त्याची पोलिसंनी चौकशी केली. गेल्या काही वर्षात फाटक याने १५ जणांना पिस्तूल परवाना मिळवून दिल्याची माहिती तपासात मिळाली. फाटकने सादर केलेल्या प्रकरणांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. परवान्यासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. पंधरा जणांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
त्या पोलीस निरीक्षकाची चौकशी होणार
सरोदेने शस्त्र परवाना देण्यासाठी येरवड्यातील पत्ता दिला होता. शस्त्र परवाना प्रकरणाची फाईल वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आली होती. येरवड्यातील पत्त्यावर सराेदे गेले चार वर्ष वास्तव्य करत असल्याचा अहवाल संबंधित तत्कालीन पोलीस निरीक्षकाने दिला होता. सरोदेने दिलेला पत्ता अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षकाची चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
























