पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणात ९ जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शिवाजीनगर न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच पोलिसांना धक्काबुक्की, बेकायदा जमाव जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिवाळीत पैसे वाटप करण्याची बतावणी; ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास – सविस्तर बातमी
नामदेव उमाजी पवार (वय ५९), प्रशांत नामदेव पवार (वय ३२), शांता नामदेव पवार (वय ५२), सोपान विठ्ठल चव्हाण (वय ३३, रा. सर्व रा. मोरे वस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड), अमित विलास पवार (वय ३२), आशा गोरखनाथ चव्हाण (वय ३१, रा. लोणी काळभोर), सविता लहू चव्हाण (वय ३८ ), लहू नारायण चव्हाण (वय ४४), प्रांजल लहू चव्हाण (वय २३, रा. रामनगर तांडा, माजलगाव, जि. बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत रिजवाना फिरोज गाजेखान (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील सुनावणी शिवाजीनगर न्यायालयात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास सुरू होती. या प्रकरणात न्यायालयाने आदेशाने दिले. आदेश देण्याचे कामकाज सुरू असताना आरोपींनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले. न्यायालयीन कक्षाच्या बाहेर गोंधळ घालू नका, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, तसेच सरकारी कामात अडथळा आणला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक फटांगरे तपास करत आहेत.
बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप शंकरराव जायभाये (वय ४२, रा. पद्मजा अपार्टमेंट, विकासनगर, देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत जायभाये यांची पत्नी सुनीता (वय ४०) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दिलीप जायभाये हे २७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरुन देहूरोडकडे निघाले होते. वारजे भागात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जायभाये यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराला वैद्यकीय मदत न करता पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ रायगोंडा तपास करत आहेत.























