भवानी पेठेतील घटना
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : रिक्षाचालक तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अस्लम युसूफ खान (वय ३०, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खान याचा मोठा भाऊ मुझ्झमील (वय ३३, रा. चमनशहा दर्ग्याजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिवाळीला गावी चाललाय…फ्लॅटची सुरक्षितता वाढवा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम हा रिक्षाचालक असून, तो गॅरेजमध्ये रिक्षा दुरस्तीचे कामे करायचा. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) त्याचा महापालिका काॅलनी क्रमांक दहा परिसरातील एका तरुणाशी वाद झाला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास तो काशेवाडी भागातून निघाला होता. चमनशहा दर्ग्याजवळ आरोपी तरुणाने अस्लम याला अडवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला मारहाण केली. (Pune Crime News) त्याच्या डोक्यात दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून तो पसार झाला. जखमी अवस्थेतील अस्लम याला चक्कर आली.
जखमी अवस्थेत तो घरी गेला. चक्कर आल्याने तो घरात झोपला. झोपेतच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी तो झाेपेतून जागा झाला नाही. त्याला कुटुंबीयांनी जागे करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. चौकशीत अस्लम याला एका तरुणाने मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणात एकाला अटक
गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विराेधी पथकाने मुंढवा परिसरात अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा तीन किलो गांजा जप्त करण्यात आला.सनी शाम गुमाने (वय २७, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक मुंढवा भागात गस्त घालत होते. त्या वेळी एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गुमाने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून तीन किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत एक लाख ५१ हजार रुपये आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गांजा, मोबाइल संच असा एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुमाने याने गांजा कोणाकडून आणला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, आशा भिंगारे, सहायक फौजदार विठ्ठल साळुंके, संदीप राजे, नीलेश जाधव, अतुल क्षीरसागर, तुषार साळुंके, किरण जाधव, विशाल भिलारे यांनी ही कारवाई केली.























