घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये धास्ती
marathinews24.com
पुणे – Pune Diwali Home Security Tips : नागरिकांनो दिवाळीसाठी सहकुटूंब बाहेरगावी जात असल्यास घरासह फ्लॅटच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या वाढलेल्या घटनांमुळे चोरटे सुसाट आहेत. विशेषतः ऐन दिवाळीत सोसायट्यांसह फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांकडून घरफोडीच्या घटना यापुर्वी घडल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करण्यासाठी मूळगावी जात असल्यास खबरदारी घेउन शेजारच्यांना माहिती द्यावी. सुरक्षारक्षक, सोसायटीचे अध्यक्षानाही सूचित करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करणारा गुंड तुषार हंबीर अटकेत – सविस्तर बातमी
पुण्यात नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्यांची संख्या मोठी आहे. सण उत्सवात अनेकांकडून मूळगावी जाण्यास प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने दिवाळीसाठी बहुतांश जणांकडून गावी जाण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून बंद फ्लॅटची रेकी करुन घरफोडी केल्याचे काही घटनांवरुन दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. (Pune Diwali Home Security Tips) दरम्यान, काही दिवसांपासून शहरात दुचाकीस्वार चोरट्यांसह घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरांसह फ्लॅटची सुरक्षितता घ्यावी. रोकड, सोन्या-चांदीचे दागिने सोबत घेउन जावे, मौल्यवान ऐवज घरात ठेवू नये.
दिवाळीमध्ये गावी जाण्याबरोबरच पर्यटन करण्यास प्राधान्य दिले जाते. ऐन सणासुदीच्या काळात महिलांकडून दागिने परिधान करण्यावर भर दिला जातो. मात्र, चोरट्यांकडून महिलांना लक्ष्य करीत दागिने हिसकावून नेल्याच्याही घटना यापूर्वी घडल्या आहेत. दरम्यान, एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांतून केलेल्या प्रवासातमौल्यवान वस्तू, दागिने गहाळ किंवा चोरीला होण्याच्या भीती असते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बाहेरगावी जाताना नागरिकांनी शेजारच्यांना माहिती देणे, सोसायटीचा सुरक्षारक्षकांना गावी जात असल्याचे सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे संभाव्य घरफोडीच्या घटना टाळता येणार आहेत. त्यासोबतच प्रवासादरम्यान ऐवजाची काळजी घ्यावी लागणार आहे.
अनेकांकडून पर्यटनाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेटससह फेसबुकवर अपलोड केले जातात. त्यामुळे संबंधित कुटूंबियाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते. नेमकी संधी साधून चोरट्यांकडून घरफोडी केली जात असल्याचे यापुर्वीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चोरट्यांनी फेसबुकवरील फोटो, स्टेटस पाहून घरफोडी केल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे गावी जाताना अथवा पर्यटनाला गेल्यानंतर स्टेटसद्वारे लोकेशनचा दिखावा टाळल्यास चोरीसारख्या घटनांना आळा बसणार आहे. दरम्यान, घरफोडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ अधिकार्यांना सुरक्षितेबाबत सुचित केले आहे. त्याशिवाय पेट्रोलिंग वाढविण्यावर भर दिला आहे. पोलिसांसोबत नागरिकांनीही आपआपल्या मालमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे चोरीसह इतर घटना कमी घडण्यास मदत होणार आहे.
नागरिकांनो, गावी जाताना घ्या काळजी
– घरात सोने, रोकड ठेवू नका
– सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी
– घराला लोखंडी जाळीचा सेफ्टी दरवाजा गरजेचा
– सोसायटीतील सीसीटीव्ही कार्यन्वित असल्याची खात्री करावी
– रात्रीच्या वेळी घरातील आणि बाहेरील लाईट सुरू ठेवावी
– संशयित दिसणार्यांची माहिती पोलिसांना द्या
– शेजारी गावी जाणार नसल्यास त्यांना माहिती द्यावी























