पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
marathinews24.com
पुणे – खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेला हडपसरमधील गुंड तुषार हंबीर याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. तुषार नामदेव हंबीर (वय ४०, रा. गोंधळेनगर, श्री छत्रपती महाराज चौक, हडपसर) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, गर्दी, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल आहेत़.
फ्लॅटचे कुलूप तोडून ७ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी
रंदर तालुक्यातील कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यावर ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ही घटना घडली होती. याबाबत एका व्यावसायिकाने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे कापूरहोळ येथे मद्य विक्री दुकान आणि उपाहारगृह आहे. त्यांचा मुलगा दुपारी दुचाकीवरून उपाहारगृहातून घरी निघाला होता. त्या वेळी मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. याबाबतची माहिती व्यावसायिकाला मिळाली. त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी शिरवळपर्यंत मोटारीचा पाठलाग केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पुरंदर तालुक्यातील पिसुर्डी येथे व्यावसायिकाचा मुलाला सोडून देण्यात आल्याचे समजले.
पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुलाची चौकशी केली, तेव्हा मोटारीतून आलेल्या पाच ते सहा जणांनी अपहरण केले. मोटारीत त्यांनी मुलाला धमकावले. एकाने पिस्तुलाचा धाक दाखविला. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने कोयता उगारून जिवे मारण्याची धमकी दिली. समोरून पोलिसांचे वाहन येत होते. अपहरण करणाऱ्या आरोपींनी मोटार शेतात नेली. मला रस्त्याकडेला सोडून देण्यात आले. पोलिसांनी मोटारीचा पाठलाग केला. आरोपींची मोटार रस्त्याच्या कडेला उलटली. आरोपी मोटार तेथेच सोडून पसार झाले, अशी माहिती व्यावसायिकाच्या मुलाने पोलिसांना दिली.
पोलिसांनी तपास सुरू केला. व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण तुषार हंबीर आणि साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. कारवाईनंतर टोळीचा म्होरक्या हंबीर पसार झाला होता. तो हडपसरमधील फुरसुंगी भागात येणार असल्याची माहिती तपासात मिळाली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, डाॅ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक युवराज धोंडे, पोलीस कर्मचारी रामदास बाबर, संतोष तोडकर, राजू मोमीन, अमोल शेडगे, तुषार भोईटे, चेतन पाटील, भारत मोहळ यांनी ही कामगिरी केली.























