सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Pune Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ डाॅक्टरांची १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ८० वर्षीय डाॅक्टरांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात ८० वर्षांच्या जेष्ठाला हाव नडली, १९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सोमवार पेठेत राहायला आहेत. जुलै महिन्यात चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. चोरट्यांच्या बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी १९ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.
‘पेन्शन कार्ड’च्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक
Pune Cyber Crime पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ऑक्टोबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेकडून बोलत असून बँकेकडून पेन्शन कार्ड देण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख रुपयांची रोकड काडून घेतली.























